Breaking News

श्रीरामपूर एसटी आगाराबाबत गंभीर तक्रारी


श्रीरामपूर / प्रतिनिधी :- श्रीरामपूर बस्थानकात नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. बसस्थानकात बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. बसही वेळेवर सुटत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना खूप वेळ वाट पाहत थांबावे लागत आहे. बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज पसरले आहे.
श्रीरामपूर बसस्थानक हे आसपासच्या अनेक गावांसाठी महत्वाचे मध्यवर्ती बसस्थानक असल्याने याठिकाणी प्रवाशांची सतत वर्दळ असते. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एसटी बसची खूप वेळ वाट पाहावी लागते. त्याचप्रमाणे संत बस नियमित वेळेवर निघत नाही, अशा तक्रारी करण्यात आल्या आहेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे तत्कालीन परिवहनमंत्री असताना शिर्डी, कोल्हार, राहता आदी ठिकाणी भव्य दिव्य असे बसस्थानक बनवण्यात आले. परंतु श्रीरामपूरकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी श्रीरामपूर येथे प्रशस्त बसस्थानक व्हावे, यासाठी लक्ष द्यावे, अशी जनतेची मागणी आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी लक्ष घातल्यास श्रीरामपूरमध्ये बसस्थानक निर्माण होऊ शकते. दरम्यान, या बसस्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतूक सुरु आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. याशिवाय एसटी बसेस जाण्यास या परिसरात अनेक अडथळे निर्माण होत आहेत. खासगी प्रवाशी वाहतूक करणारे वाहन चालक या बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे प्रवाशांना तातडीने वाहन मिळत असले तरी महामंडळाच्या अर्थव्यवस्थेवर याचा विपरीत परिणाम होत आहे.