Breaking News

विभाजनाचे फळे भोगत आहोत विरोधकांचा लोकसभेत गदारोळ.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला लोकसभेत उत्तर दिले. मात्र, यावेळी विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. 15 लाखांच्या घोषणेचे काय झाले? अशी घोषणाबाजी करत विरोधकांनी पंतप्रधान मोदी यांनी घेरण्याचा प्रयत्न केला. तब्बल दीड तास विरोधकांची घोषणाबाजी सुरु होती. सभागृहात घोषणाबाजी सुरु असताना आपल्या आक्रमक शैलीत मोदींनी काँग्रेसवर विभाजनाचा आरोप केला. 


भारताचे तुकडे करुन विष पसरण्याचे काम काँग्रेसने केले आहे. याची शिक्षा स्वांतत्र्यानंतरच्या 70 वर्षानंतरही भारतीय नागरिक भोगत आहेत, अशा भाषेत मोदींनी काँग्रेसवर तोफ डागली. काँग्रेसने निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आंध्रप्रदेशचे विभाजन केले. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी हैदराबादच्या लोकप्रिय दलित मुख्यमंत्र्यांचा अपमान केल्याचीही आठवण मोदींनी यावेली करुन दिली. ‘ज्यांनी कायम घराणेशाहीच केली त्यांनी लोकशाहीबद्दल बोलू नये.’ अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. ‘नेहरु यांनी लोकशाही देशाला दिली. हे ऐकून मी हैराण झालो. लिच्छवी साम्राज्य आणि बौद्धाच्या वेळी लोकशाही सुरु होती. त्यामुळे काँग्रेस आणि नेहरुंनी देशाला लोकशाही दिलेली नाही. खर्गे हे एका कुटुंबाची भक्ती करुन इथे बसले आहेत. पण तुम्ही जगतगुरु बसवेश्‍वर यांचे नाव घेण्यास विसरु नका. लोकशाही आमच्या रक्तात आहे, लोकशाही आपली परंपरा आहे.’ असा टोलाही मोदींनी हाणला. ‘सुरुवातीच्या काळात पंचायतपासून संसदेपर्यंत तुमच्याचा झेंडा होता. पण इतिहास विसरुन सर्व शक्ती फक्त एकाच कुटुंबाचे गुणगान गाऊ लागला. त्यामुळेच देशाचा विकास झाला नाही. असे म्हणत मोदींनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर निशाणा साधला.