Breaking News

रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर ‘जैसे थे’

नवी दिल्ली : अर्थसंकल्पानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने बुधवारी नवे त्रैमासिक पतधोरण जाहीर केले. नव्या पतधोरणात व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहेत. अर्थसंकल्पातील नव्या तरतुदी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलात झालेली वाढ यानंतर व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. 

रेपो रेट 6 टक्के तर रिव्हर्स रेपो रेट 5.75 टक्क्यांवर कायम ठेवत भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला. तर सीआरआर दर 4% च राहणार आहेत. गेल्या तिमाहीसाठी देखील हे दर इतकेच होते. रेपो दरांचा संबंध हा बँकाचे कर्ज आणि हफ्त्यांशी असतो. रेपो दप कमी झाल्यास कर्जावरचा व्याजदर कमी होतो. वाढत्या महागाईमुळे रेपो रेट कमी होऊन कर्ज स्वस्त होईल अशी आशा सामान्य माणसाला होती. पण रिझर्व्ह बँकेच्या नवीन पतधोरणामुळे ही आशाही धुसर झाली आहे. ऑगस्ट 2017 मध्ये रेपो दर थोडा कमी करण्यात आला होता. तसेच सप्टेंबर 2018 पर्यंत महागाईचा दर 5.1% ते 5.6% राहणार आहे. तर पुढच्या वर्षी हाच दर 4.1% पर्यंत खाली येऊ शकतो. एकंदर कराचा टक्का वाढला असूनसुद्धा कराच्या उत्पन्नामध्ये काहीच सवलत बजेटमध्ये देण्यात आली नाही. तसेच व्याजदरातही कपात करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता येत्या काळात सामान्य माणसाला काही दिलासा मिळतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.