Breaking News

नोकरी महोत्सव राज्यासाठी दिशादर्शक ठरला : आ. थोरात


संगमनेर प्रतिनिधी :- युवा नेते व शिवराय निर्माण संघटना संस्थापक अध्यक्ष रणजितसिंह देशमुख व मिलींद कानवडे यांच्या संकल्पनेतून आयोजित नोकरी महोत्सवातून १ हजार २१० युवकांना विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकर्‍या मिळाल्या आहेत. ९८४ युवकांची जागेवर निवड तर २५२ युवकांना तेथेच नियुक्ती पत्र देण्यात आले. तर ५ हजार ५६४ युवकांना जॉब कार्ड देण्यात येणार आहे. एकीकडे देशात बेरोजगारी वाढत असतांना संगमनेरमध्ये राबविलेला हा नोकरी महोत्सव राज्यासाठी दिशादर्शक ठरला आहे, असे गौरवौद्गार आ. बाळासाहेब थोरात यांनी काढले.
यशोधन प्रांगणात शिवराय निर्माण संघटनेच्यावतीने आ. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त नोकरी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. भाऊसाहेब कांबळे, माजी आ. कल्याण काळे, बाजीराव खेमनर, अ‍ॅड. माधवराव कानवडे, विनायक देशमुख, राजेंद्र नागवडे, रणजितसिंह देशमुख, इंद्रजित थोरात, मा. आ. शरद आहेर, अजय फटांगरे, मिलींद कानवडे, रामदास वाघ, भाऊसाहेब कुटे, लक्ष्मणराव कुटे, शिवाजीराव थोरात, नवनाथ अरगडे, अमित पंडित, भागवत डोईफोडे आदी उपस्थित होते. 

आ. थोरात म्हणाले, या नोकरी मेळाव्यात देश व आंतरराष्ट्रीय पातळीवरील ६० कंपन्यांचा सहभाग होता. सुमारे ६ हजार ५०० युवकांची उपस्थिती, हे या मेळाव्याचे यश आहे. बेरोजगारी हीच देशापुढील सर्वात मोठी समस्या असून युवकांना नोकरी देण्यासाठी अशा मेळाव्यांचे सर्वत्र आयोजन होणे आवश्यक आहे.

माणिकराव ठाकरे म्हणाले, ग्रामीण भागातील मुलांमध्ये मोठी गुणवत्ता आहे. बेरोजगार मुलांना अशा महोत्सवातून नोकर्‍या मिळाल्या पाहिजे, यासाठी असे उपक्रम खूप महत्वाचे आहेत. नोकरी ही समस्या मोठी आहे. बेरोजगार मुलांना नोकरी मिळावी, यासाठी जे प्रयत्न केले, ते खुप स्त्युत आहेत. प्रारंभी मिलींद कानवडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन निलेश पर्बत यांनी केले.