Breaking News

जिजाऊ, शिवराय, अहिल्यादेवी होळकर संस्कारात नवी पिढी घडवा : गिरीष महाजन

जळगाव, दि. 01, फेब्रुवारी - जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी ही 40 हजार सभासदांचा विश्‍वास असलेली एक मोठी संस्था आहे. या संस्थेचा सभासद नियमित कर्जाची परफेड करतो. या संस्थेचे सभासद शिक्षक मोठ्या संख्येने आहेत. शिक्षक समाज घडवतात. त्यांनी जिजाऊ, शिवराय, अहिल्यादेवी होळकर, भगतसिंग यांच्या संस्कारात नवी पिढी घडवावी, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी जळगाव येथे केले.


जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी (ग. स. सोसायटी) च्या वतीने आदर्श शिक्षक, जेष्ठ सभासद तसेच सभासदांचे गुणवंत पाल्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन गिरीष महाजन बोलत होते. महाजन पुढे म्हणाले, आज शेतकरी अडचणीत आहे. शेतीला पुरेसे पाणी व वीज दिली तर शेतकऱ्याला कर्ज माफी न देता सुध्दा त्याची प्रगती होईल. राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यामुळे हजारो कोटींची कर्ज माफी या सरकारने दिली आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्यांना अभिमान वाटेल असे काम हे सरकार करीत आहे.

मी पक्षाचा साधा कार्यकर्ता आहे. पक्षाच्या शिस्तीत काम करणारा माणूस आहे. आता जनता हुशार होते आहे. ती पुढाऱ्यावर लक्ष ठेवते. आम्हालाही दर पाच वर्षांनी परीक्षा द्यावी लागते. मी स्वतः जनतेची कामे करुन परीक्षा पास होण्याचा प्रयत्न करतो. आज देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे सक्षम नेतृत्व आहे. देशाच्या प्रगतीसाठी आपण जातपात विसरुन मिशन फक्त माझे राष्ट्र याला महत्व दिले पाहिजे. तरुण पिढी आज व्यसनाच्या आहारी गेली आहे. पान टपरी, बियर बार वर जास्त गर्दी दिसते. आपण समाजाला व्यसनमुक्त केले पाहिजे, असेही ते म्हणाले.