Breaking News

काळे महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा


तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी {दि. २६ } सकाळी अकरा वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्राचार्या डॉ. विजया गुरसळ यांनी दिली. या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी रयत शिक्षण संस्थेच्या मनेजिंग कौन्सिल सदस्या मीना जगधने या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धा पार पडणार आहेत. स्पर्धेसाठी ‘कर्मवीर शंकरराव काळे: एक समाज अभियंता, शेतीविषयक धोरणे व स्वामीनाथन आयोग, समाज माध्यमे व आजची तरुणाई ,रोजगारभिमुख शिक्षण काळाची गरज, दावूनी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा’ आदी विषयांचा समावेश आहे. या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस रुपये ३००१/-, द्वितीय २००१/- रुपये, तृतीय रुपये १ हजार ५०१ रु. आणि उत्तेजनार्थ १ हजार १ रुपये देण्यात येणार आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण या स्पर्धा संपल्यानंतर स्पर्धेच्या ठिकाणी होणार आहे. विद्यार्थी कल्याण मंडळाचे जिल्हा समन्वयक डॉ. बालाजी घारुळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. गुरसळ आणि विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रा. सिकंदर शेख यांनी केले आहे.