Breaking News

वंचित शेतकर्‍यांनाही मिळणार कर्जमाफी ! : सुभाष देशमुख

सोलापूर : कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांनाही आता कर्जमाफी मिळणार आहे. कोणत्याही कारणास्तव कर्जमाफीचा अर्ज भरू शकलेल्या शेतकर्‍यांनी सहाय्यक निबंधकांकडे अर्ज द्यावा, असे आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले. कर्जमाफीसाठी पात्र असलेला एकही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचे सुभाष देशमुख यांनी सोलापुरात बोलताना स्पष्ट केले.

दरम्यान, राज्यात अजूनही शेकडो शेतकर्‍यांना तांत्रिक कारणास्तव कर्जमाफीपासून वंचित राहावे लागलेले आहे. त्यांच्याबाबत शासन नेमके काय निर्णय घेणार आहे. याबाबत मात्र, अद्याप सरकारकडून कोणतेच स्पष्टीकरण दिले जात नाही आहे, अशातच सहकार मंत्र्यांनी कर्जमाफीसाठी वंचित शेतकर्‍यांना पुन्हा बँकांकडे पुन्हा अर्ज भरण्याचे आवाहन केले आहे, यावरून प्रशासकीय पातळीवर अजूनही कर्जमाफीच्या अंमलबजावणीचा घोळ सुरूच असल्याचे स्पष्ट होत आहे. पण यानिमित्ताने का होईना पण वंचित शेतकर्‍यांना कर्जमाफीची आणखी एक संधी उपलब्ध होणार आहे. हीच काय ती दिलासा देणारी बाब म्हणावी लागेल.