Breaking News

अर्थसंकल्पानंतर शेअर बाजार गडगडला सेंसेक्सची 550 तर निफ्टीची 200 अंकांनी घसरण

नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्टॉकच्या कमाईवर लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लावल्याने शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली. सेक्टोरल इंडेक्समध्ये फार्मा, आयटी आणि एफएमजीसी इंडेक्स वगळता इतर सेक्टर्समध्ये घसरणीमुळे सेंसेक्स 600 अंकांपर्यंत घसरला. तर निफ्टीमध्ये 200 अंकांपर्यंत घसरण नोंदवण्यात आली.

हेवीवेट शेअर्समध्ये एचडीएफसी, ओएनजीसी, मारुती, एचडीएफसी बँक, एसबीआय, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचयूएलमध्ये नफेखोरीमुळे बाजारावर दबाव निर्माण झाला आहे.बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी शेअरद्वारे होणार्‍या कमाईवर लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लावण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा गोंधळ झाला. कारण जर एका वर्षापेक्षा अ धिक काळ ठेवलेल्या शेअर्सवर एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळाले तर त्यावर 10 टक्के टॅक्स द्यावा लागेल. त्यात सिक्युरिटी ट्रान्झेक्शन टॅक्स कायम आहे, म्हणजे गुंतवणूकदारांना दोन्ही टॅक्स द्यावे लागतील.

आशियाई बाजारांत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सिंगापूर, जपान अशा मार्केटमध्ये घसरण झाल्याचे दिसून आले. सरकारने 2018 मधील वित्तीय तूट 3.5 टक्के राहण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मार्केट एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे की, जर सरकारने वित्तीय तूट 3.2 किंवा त्यापेक्षा कमी ठेवली तर मार्केटसाठी सकारात्मक ठरले असते. पण 3.5 हा आकडा निराशा पसरवणारा आहे.