Breaking News

10 रुपयाची नाणी बिनधास्त स्वीकारा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून स्पष्ट

मुंबई : 10 रुपयांची सर्व नाणी वैध असल्याचे काही दिवसांपूर्वीच रिझर्व बँकेने स्पष्ट केले आहे. मात्र, अद्यापही अनेक जण 10 रुपयांची नाणी स्वीकारत नसल्याचे रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आल्यामुळे बँकेकडून थेट मोबाईलवर मेसेज पाठवणे सुरु केले आहे.


रुपयाचे चिन्ह असलेले आणि नसलेले अशी दोन्ही पद्धतीची 10 रुपयाची नाणी वैध आहेत असे देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.‘रुपयाचे चिन्ह असलेले आणि नसलेले अशी दोन्ही प्रकारची दहा रुपयांची नाणी वैध आहेत. त्यामुळे कोणतीही काळजी न करता ही नाणी स्वीकारा. तसेच यासंबंधी तुम्हाला अ धिक माहिती जाणून घ्यायची असल्यास आरबीआयच्या 14440 या क्रमांकावर मिस कॉल द्या.’ असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून यासंबंधी एक निवेदनही जारी केले होते. ‘10 रुपयांची सर्व नाणी वैध असून स्वीकारण्यायोग्य आहेत. त्यामुळे या नाणांच्या माध्यमातून व्यवहार होऊ शकतो.’ असं त्यावेळी स्पष्ट करण्यात आलं होतं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून वेळोवेळी वेगवेगळ्या डिझाईनची नाणी चलनात आणली आहेत. त्यामुळे ही सर्व नाणी वैध असल्याचे यात म्हटले आहे.