Breaking News

चिखलीत 22 फेब्रुवारी रोजी हजारो बेरोजगार तरूणांना रोजगार मिळविण्याची सुवर्ण संधी!

चिखली,(प्रतिनिधी): बुलडाणा जिल्हयातील सुशिक्षीत बेरोजगारांना नोकरीसाठी भटकंती आणी शोधा शोध करण्याची आलेली वेळ पाहता, त्यांना चिखलीतच त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील नामाकींत कंपन्यामध्ये रोजगार मिळविण्याची संधी श्री मुंगसाजी महाराज पुण्यतिथी निमित्त श्री मुंगसाजी महाराज सेवा प्रतिष्ठाण, चिखली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्याच्या माध्यमातुन प्राप्त झाली असून, या अलीकडच्या काळातील बुलडाणा जिल्हयातील सर्वात मोठे रोजगार मेळाव्याचे उद्घाटन खासदार राजीव सातव यांच्या हस्ते अनुराधा अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या परीसरात दिनांक 22 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 10:30 वाजता होणार आहे. या मेळाव्यासाठी आमदार राहुलभाउ बोंद्रे, आमदार हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश काँगे्रस कमिटीचे सरचिटणीस श्यामभाउ उमाळकर, प्रदेश सरचिटणीस संजय राठोड, युवक काँगे्रस जिल्हा अध्यक्ष मनोज कायंदे, महिला काँगे्रसच्या जिल्हाध्यक्ष सौ. ज्योतीताई ढोकणे, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहाण, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष प्रमोद दादा अवसरमोल, आणि जिल्हा काँगे्रसचे पदाधिकारी, चिखली तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष विष्णु पाटील कुळसुंदर, बुलडाडाणा अध्यक्ष सुनिल तायडे, शहर अध्यक्ष अतहर काझी यांची उपस्थिती राहणार आहे. 

नोकरी मिळविण्यासाठी बुलडाणा जिल्हयातील तरूणांना व बेरोजगारांना पुणे, मुुंबई सारख्या शहरात आपल्या शिक्षणाची कागदपत्रे घेवून विविध कंपन्यांच्या कार्यालयात चकरा माराव्या लागातात. त्यासाठी लागणारा प्रचंड वेळ आणी पैसा यामुळे सर्वांनाच सर्व ठिकाणी मुलाखती किंवा भेटी देणे शक्य होत नाही, परंतु उत्पादन, बँकींग, रिटेल, प्रशिक्षक, टेलीकॉन, विमा, सेवा उद्योग, कृषी विषयक, नर्सिंग, अ‍ॅटोमोबाईल, याचबरोबर गार्ड, कामगार व बीपीओ, केपीओ, क्षेत्रात 5 वी ते पदविधर 18 ते 35 वयोगटातील युवक युवतींसाठी नोकरीची सुवर्णसंधी चिखली येथेच श्री मुंगसाजी महाराज सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या मेळाव्यात कंपनीचे प्रतिनिधी, आलेल्या उमेदरांच्या मुलाखती घेवून तिथल्या तिथे उमेदवाराची निवड करणार आहे. दिनांक 22 फेब्रुवारी रोजी अनुराधा अभियात्रीकी महाविद्यालयाच्या परीसरात होणा-या या भव्य रोजगार मेळाव्यात एल.आय.सी., आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सीस बॅक, एस.डी.एफ.सी. बँक, रिलान्स, टाटा डोकोमो, पेटीएम, एसबीआय लाईफ, युरेका फार्बस्, बायो केअर, हॉस्पीकेअर, महिंद्रा, बजाज फायन्स, टाटा पार्क, यांच्या सारख्या 40 च्या वर नामाकींत कंपन्याचे प्रतिनिधी रोजगार निवडीसाठी या ठिकाणी हजर राहणार असुन 5 वी ते पदविधर आणी आय.टी.आय. पदविका असलेल्या सर्वच प्रकारातील नोकर्या मिळविण्याची युवकांना ही सुवर्ण संधी आहे. यासाठी नोंदणी विनामुल्य असुन मेळाव्याच्या ठिकाणी सुध्दा नोंदणी करण्यात येणार आहे. तरी याचा लाभ सर्वांनी घ्यावा अशी विनंती सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आली आहे. श्री मुंगसाजी महाराज सेवा प्रतिष्ठाण आपल्या विविध उपक्रमाने सर्वसामान्यांच्या जिवनात सुखाचे आगमन व्हावे, यासाठी प्रयत्नरत असते. बेरोजगारी ही समस्या सर्वत्र आहे, नोकरीच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध होत आहेत, त्यातच नामाकींत कंपन्या चिखली बुलडाणा सारख्या गावापासून शेकडो किलोमिटर अंतरावर असल्याने मोठा खर्च करून या गावांना राहणे, नोकरीसाठी मुलाखती देणे, हे सर्वांनाच परवडत नाही. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या कर्तबगार युवक, युवतींच्या शोधात असलेल्या कंपन्यांनाच या परीसरात आणने व युवक युवतींना नोकरीची संधी उपलब्ध करून देणे यासाठी श्री मुंगसाजी महाराज सेवा प्रतिष्ठाणने पुढाकार घेतला असुन विनामुल्य नोंदणीवर एकाच छताखाली जवळपास 40 चे वर कंपन्यांच्या मुलाखती देण्याची संधी त्यांना उपलब्ध करून दिली आहे. त्याचा जिल्हातील युवक युवतींनी आवर्जुन फायदा घ्यावा असे आवाहन श्री मुंगसाजी महाराज सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने, जिल्हा कॉगे्रसचे अध्यक्ष आमदार राहुलभाउ बोंद्रे, श्री मुंगसाजी महाराज सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दिपक देशमाने यांनी केले आहे.