Breaking News

अर्थसंकल्पीय अधिवेशनात 16 विधेयके मांडणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी अर्ज करता आले नाहीत अशा शेतकर्‍यांना 31 मार्चपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.


कापसावरील बोंडअळी,धानावरील तुडतुड्यांमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी 2 हजार 425 कोटी रुपयांचा मदतीचा प्रस्ताव केंद्र शासनाला सादर करण्यात आला असून, केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती अंतिम मंजूरी देणार आहे. या अधिवेशनात लोकोपयोगी 16 विधेयके मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कर्जमाफीसाठी सरकारने 54 लाख 72 हजार 311 अर्ज बँकांकडे पाठवले. त्यातील आठ लाख 63 हजार अर्ज त्रूटींमुळे परत आले. त्यातील दोन लाख 76 हजार अर्ज आम्ही दुरूस्त्या करून पुन्हा पाठवले. एकूण 46 लाख 35 हजार 648 शेतकर्‍यांना कर्ज माफ करण्याचे पैसेही देण्यात आले आहेत. यातील 30 लाख कर्जमाफीचे तर उरलेले कर्ज तडजोडीचे आहेत. 13 लाख अर्जांची तालुकास्तरीय समिती पुन्हा निरीक्षण करत आहे. साधारण एक लाख अर्जदारांचे कर्ज दोन ते चार हजार रूपयांचे शिल्लक आहे. त्यामुळे त्याची तितकीच भरपाई होणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.बोंडअळीमुळे झालेले कापसाचे तसेच तुडतुड्यामुळे झालेल्या धानाची नुकसानभरपाई देण्यासाठी सरकारने केंद्राकडे 2425 कोटींची मागमी केली आहे. हा विषय अंतीम टप्प्यात असून लवकरच ही मदत मिळेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.