Breaking News

पवारांच्या निवासस्थानी विरोधकांचे खलबते !

नवी दिल्ली : मोदी सरकारविरोधात देशभरातले विरोधी पक्ष एकवटत असल्याचे चित्र पाहायला मिळत असून, मुंबईत झालेल्या संविधान रॅलीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीतील निवासस्थानी विरोधकांसोबत बैठक घेतली. दिल्लीत पवारांच्या घरी असलेल्या बैठकीला विरोधी पक्षातील विविध ज्येष्ठ नेत्यांनी सहभाग नोंदवला. अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. पुढची बैठक सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेत पार पडणार आहे.


पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, जनता दलाचे शरद यादव, माकप नेते टी. के. रंगराजन, डी. राजा, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, माजिद मेमन, डी.पी. त्रिपाठी, तारीक अन्वर उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनी सर्व विरोधकांनी सरकार विरोधात संविधान बचाव रॅली काढली होती. त्यानंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी पुढची बैठक दिल्लीत घेण्याचे ठरले होते. या रॅलीत शरद पवार, शरद यादव, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी, तुषार गांधी, राजू शेट्टी यांच्यासह अनेक नेत्यांनी सहभाग घेतला होता.