Breaking News

स्पर्धा परीक्षा उमेदवारांचा 8 फेब्रुवारीला ‘एल्गार’

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षेला जाणार्‍या उमेदवारांची बायोमेट्रिक हजेरी घेण्यात यावी, राज्य सेवा परीक्षेच्या जागांच्या संख्येत वाढ करावी, या मागणीसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे उमेदवार 8 फेब्रुवारीला शनिवारवाड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत राज्यव्यापी मोर्चा काढणार आहेत.एमपीएससी परीक्षेतील डमी रॅकेट प्रकरण नांदेडमधील युवक योगेश जाधव यांनी नुकतीच उघडकीस आणले. त्यानंतर पोलिसांकडून चौकशी सुरू झाली असून, काही जणांना अटक झाली. मात्र योगेश जाधव यांच्यावर गेल्या 12 दिवसांपूर्वी नांदेडमध्ये हल्ला झाला. 


त्या निषेधार्थ आज स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमेदवार नाना-नानी पार्कमध्ये एकत्र आले. ह्या हल्ल्याचा निषेध केला. एमपीएससी परीक्षेतील गैरप्रकार थांबण्यासाठी आयोगाने परीक्षेला जाणार्‍या प्रत्येक उमेदवारांची बायोमेट्रिक हजेरी घ्यावी. त्यामुळे डमी उमेदवार बसणार नाही. परीक्षेतील डमी प्रकरण रोखण्यासाठी सर्व उमेदवारांनी लढा देण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी समिती नेमली आहे.त्याचप्रमाणे राज्यसेवा परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली. केवळ 59 पदांसाठी ही परीक्षा होत असून, पदांची संख्या फारच कमी आहे. पदांच्या संख्येत वाढ करावी, याकडे लक्ष वेधण्यासाठीही मोर्चा असणार आहे. समितीच्या माध्यमातून 8 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे उमेदवार सहभागी होणार असल्याचे किरण निंबोरे व महेश बढे याने सांगितले.