Breaking News

लेन्स आर्टच्या कार्यक्रमाने वाढविली पक्ष्यांबद्दलची उत्सुकता


रत्नागिरी  येथील लेन्स आर्ट संस्थेच्या आज पार पडलेल्या पक्षिनिरीक्षण आणि छायाचित्रण मार्गदर्शन वर्गात नयनीश गुढेकर आणि डॉ. विक्रम घाणेकर यांनी सर्व सभासदांना पक्षिनिरीक्षण आणि त्यासाठी लागणारे छायाचित्रण कौशल्ये याबद्दल मार्गदर्शन केले. 

सकाळी पार पडलेल्या पक्षी निरीक्षणामध्ये श्रीकांत ढालकर यांनी विविध पक्ष्यांचे आवाज काढून अक्षरशः धमाल उडवून दिली. सकाळी साडेसहा वाजता जमलेल्या 48 लोकांच्या चमूने विभागणीनुसार रत्नागिरी परिसरातील चंपक मैदान, गुरूमळी आणि पोमेंडीमध्ये पक्षिनिरीक्षण केले. त्यानंतर मारुती मंदिर येथील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात निखिता शिंदे हिने पाहुण्यांचे स्वागत आणि परिचय करून दिला. सिद्धेश वैद्य याने लेन्स आर्टच्या कामाबद्दल माहिती दिली.


श्री. ढालकर यांनी पक्ष्यांबद्दल मनोरंजक अशी माहिती सांगितली. त्यांनी पक्ष्यांचे विविध आवाज आणि त्याचे विविध प्रकार सांगितले. लेन्स आर्टबरोबर पक्षिनिरीक्षण वर्ग घ्यायचा सुद्धा मानस बोलून दाखवला. तसेच स्वतः काढलेली पक्ष्यांची चित्रे दाखवली.


नयनीश गुढेकर यांनी विविध पक्षी त्यांच्या जाती आणि त्यांचे अधिवास याबद्दलची छायाचित्रे दाखवून सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच पक्षिनिरीक्षणाबद्दलचे अनुभव सांगितले. डॉ. विक्रम घाणेकर यांनी फोटोग्राफीबद्दलचे अनुभव कथन केले. देशविदेशात जाऊन काढलेली पक्ष्यांची आणि वन्य प्राण्यांची छायाचित्रे दाखविली.