Breaking News

मार्लेश्‍वर-गिरीजादेवीचा विवाह सोहळा उत्साहात

रत्नागिरी - संगमेश्‍वर तालुक्यातील श्रीक्षेत्र मार्लेश्‍वर आणि श्री देवी गिरीजामातेचा कल्याणविधी सोहळा आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत शांततेत पार पडला. मार्लेश्‍वर यात्रोत्सवातील आजच्या महत्वाच्या दिवशी शिवभक्तांसह राजकीय क्षेत्रातील मान्यवरा विवाहाला उपस्थित होते.


मध्यरात्री बारा वाजता हर हर मार्लेश्‍वरचा जयघोष करीत आंगवली मठातून नवरदेवासह यजमान आणि नियोजित लवाजमा मार्लेश्‍वर शिखराकडे निघाला. पालखी वाहण्याचा मान प्रथेप्रमाणे भोई समाजाचा होता, तर सोबत मशालजी म्हणून चर्मकार बंधू, मारळचे सुतार, अबदागिरी, कासारकोळवणचे तासेवाले, चौरी, न्हावी बंधू याचप्रमाणे मानकरी आंगवलीचे अणेराव बंधू आदींसह असंख्य भाविक यामध्ये सहभागी झाले होते. शिखराच्या पायथ्याजवळ असलेल्या पवईच्या पायरीवर साखरप्याहून आलेल्या वधू गिरीजादेवीची पालखी आणि आंगवलीतील मंडळी उत्तररात्रीनंतर एकत्र आल्यावर हर हर महादेवाच्या जयघोषाने सारा सह्याद्री दुमदुमून गेला. शिखरावर पोचल्यावर तिन्ही पालख्यांचे प्रथेप्रमाणे पारंपरिक स्वागत करण्यात आले. त्यानंतर तिन्ही पालख्या नियोजित ठिकाणी वस्तीला गेल्या. दुपारी विवाहासाठी 360 मानकर्यांना रीतसर निमंत्रण देण्यात आले. त्यानंतर मुहूर्तावर श्री देव मार्लेश्‍वर आणि गिरीजादेवीचे लग्न लावण्यात आले. यासाठी हिंदू धर्मातील लिंगायत धर्मीय शास्त्रानुसार पंचकलशाची मांडणी करण्यात आली होती. यावेळी करवलीचा मान प्रथेप्रमाणे गोठणे गावाकडे होता. मंगलाष्टका आणि मंत्रोच्चारांच्या मंगल वातावरणात हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. 

आजची गर्दी लक्षात घेऊन मारळ परिसरासह मार्लेश्‍वर पायथा ते शिखर, धारेश्‍वर धबधबा आणि करंबेळीचा डोह आदी भागात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देवरू खचे पोलिस निरीक्ष शिवाजी पाटील कालपासूनच यात्रास्थळी विशेष लक्ष ठेवून होते. राज्य परिवहन महामंडळाने पार्किंगपासून थेट पायथ्यापर्यंत जाणारी विशेष बससेवाही सुरू के ली होती. देवरूख, संगमेश्‍वर, साखरपा, माखजन, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, राजापूर, दापोली अशा आगारातून महामंडळाच्या जादा फेर्याही हजारो प्रवाशांना घेऊन मारळनगरीत दाखल झाल्या होत्या. यात्रोत्सवाच्या ठिकाणी अनेक स्वयंसेवी संस्थांनी खिचडी प्रसाद, मोफत सरबत, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा असे उपक्रम राबविले. आजच्या यात्रोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.