Breaking News

नायलॉन मांजाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अनोखा उपक्रम

नाशिक, - राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या वतीने नायलॉन मांजाच्या विरोधात दरवर्षी प्रमाणे यंदाही नाशिक शहरातील शाळांमध्ये एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. शहरातील शाळांमध्ये जावून शालेय विद्यार्थ्यांना साधा दोरा व कागदी पतंगीचे वाटप करून त्यांनी नायलॉन दोरा न वापरण्याची शपथ मुलांसमवेत घेतली.


पतंग उडविताना नायलॉन मांजाच्या वापरामुळे अनेक अपघात होवून नागरिक तसेच पक्षी जखमी होतात. यात काहीना तर आपला जीव देखील गमवावा लागतो. असे अपघात रोखण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर न करता साधा दोर्‍याचा वापर करावा असे आवाहन खैरे यांनी केले. त्यांनी आज युवक पदाधिकार्‍यांसमवेत शालेय विद्यार्थ्यांना पतंगाचा साधा दोरा व कागदी पतंगाचे वाटप करून नायलॉन दोरा न वापरण्याची शपथ मुलांसमवेत घेतली. खैरे यांच्या संकल्पनेतून नाशिक शहरातील विविध शाळांमध्ये मुलांना पतंगाचा साधा दोरा व कागदी पतंग वाटप करण्यात आले व यातून समाजामध्ये नायलॉन दोरा न वापरण्याची जनजागृती केली जात आहे. 

नायलॉन मांजाच्या वापरावर सर्वोच्च न्यायालयानेच बंद लावली असून सूद्धा शहरात छुप्या पद्धतीने याची विक्री केली जात आहे. हा नायलॉन मांजा विकत घेतलाच नाही तर त्याची विक्री थांबेल याकरिता जनजागृतीची गरज असून त्याची सुरवात शालेय मुलांपासून करण्यात आली. पतंग उडविताना नायलॉन दोर्‍याच्या वापरामुळे अनेक अपघात होतात यामध्ये अनेकांना जीव देखील गमवावा लागला आहे. त्याचबरोबर पक्षांना देखील याचा मोठा त्रास होतो अनेक पक्षी यात जखमी होतात तसेच त्यात त्यांचे प्राण देखील जातात. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून नाशिक शहरातील विविध शाळामध्ये साधा दोरा व पतंगाचे वाटप करून नायलॉन दोरा न वापरण्याची शपथ घेण्यात येत आहे व यातूनच समाजामध्ये जनजागृती होईल असेही खैरे त्यांनी म्हटले आहे.