पाणीपुरवठ्यासाठी महापालिका सदस्यासह नागरिकांचे आंदोलन
सांगली,- सांगली शहरातील विस्तारित भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा नियमित व शुध्द पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी सांगली महापालिका सदस्यासह नागरिकांनी शुक्रवारी सुमारे 100 फूट उंच असणा-या पाणीपुरवठा करणार्या टाकीवर चढून ’शोले स्टाईल‘ आंदोलन केले. या आंदोलनामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील अधिकार्यांसह पोलीस प्रशासनाची चांगलीच घाबरगुंडी उडाली. अखेर पुढील चार दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर संबंधितांनी हे आंदोलन मागे घेतले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजू गवळी यांच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन करण्यात आले. राजू गवळी यांच्या प्रभागातील त्रिमुर्ती कॉलनी, गुलाब कॉलनी, शंभर फुटी रस्ता, रामकृष्ण परमहंस सोसायटी व लक्ष्मीनारायण कॉलनी यासह अन्य विस्तारित भागात गत आठवडाभरापासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. अनेकदा मळीमिश्रीत व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होतो. याबाबत पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी राजू गवळी यांच्यासमवेत आंदोलन केले.
गुलाब कॉलनी परिसरातील 100 फूट उंच पाणीपुरवठा करणा-या टाकीवर चढून राजू गवळी व अन्य नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाच्या ढिम्म कारभाराचा निषेध केला. ’पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे‘ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. महापालिका अधिका-यांच्या नावे शंखध्वनी करीत पाणीपुरवठा विभागाच्या गलथान क ारभाराचे वाभाडे काढले. तब्बल दोन तासाहूनही अधिक काळ हे आंदोलन सुरू होते. या संपूर्ण परिसरात गत आठवड्यापासून पाणीपुरवठा खंडित झाला आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता संजय धर्माधिकारी यांना वारंवार कल्पना देऊनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला.
या आंदोलनाची माहिती मिळताच पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शीतलनाथ उपाध्ये यांनी तात्काळ आंदोलनस्थळी धाव घेतली. शीतलनाथ उपाध्ये यांनी या सर्वांची समजूत काढून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र आंदोलकांनी ही विनंती साफ फेटाळून लावली. अखेर नाईलाजास्तव शीतलनाथ उपाध्ये हेही पाण्याच्या टाकीवर गेले. त्याठिकाणी राजू गवळी यांच्यासह आंदोलक नागरिकांची समजूत काढून शीतलनाथ उपाध्ये यांनी या सर्वांना खाली आणले व चर्चा केली. परंतु संतप्त नागरिकांनी संजय धर्माधिक ारी यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीवरून ठोस आश्वासन मिळत नसल्याचे पाहून पुन्हा त्यांना घेराव घातला.
हिराबाग व जलभवन येथील पाण्याच्या टाकीच्या स्वच्छता व दुरूस्तीचे काम पाणीपुरवठा विभागाने हाती घेतले आहे. त्यामुळे या भागाला अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची कबुली शीतलनाथ उपाध्ये यांनी दिली. मात्र हे काम आज सायंकाळपर्यंत पूर्ण होणार असून येत्या दोन दिवसात सुरळीतपणे पाणीपुरवठा केला जाईल. तोपर्यंत या संपूर्ण भागात टँकरने पाणीपुरवठा केला जाईल. या भागातील या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणा-या संजय धर्माधिकारी यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही शीतलनाथ उपाध्ये यांनी दिल्यानंतर राजू गवळी यांच्यासह अन्य नागरिकांनी हे आंदोलन स्थगित केल्याचे जाहीर केले. परंतु येत्या चार दिवसात या भागातील पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा राजू गवळी यांनी दिला.