पोलिसांना पाहताच सराईत गुन्हेगाराने स्वत:वरच केले ब्लेडने वार
पुणे, - सराईत गुन्हेगाराच्या राहत्या पत्त्यावर त्याला शोधण्यासाठी आलेल्या पोलिसांना पाहताच त्याने खिशातील ब्लेड काढून स्वत:वरच वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना दुपारी 12.30 वाजता हडपसर येथील रामटेकडी परिसरात घडली.
मलखेसिंग राजुसिंग दुधानी (वय-24, रा. रामटेकडी, हडपसर) असे त्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न करणे, मारामारी करणे, आर्म अॅक्ट यासाह इतरही अनेक गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात तो पोलिसांना हवा होता.त्याच्या शोधार्थ वानवडी पोलीसांचे एक पथक शुक्रवारी त्याच्या राहत्या घरी पोहोचले. दरम्यान पोलिसांना पाहताच त्याने आरडाओरड करत खिशातील ब्लेड काढले आणि तुम्ही मला खोट्या गुन्ह्यात अटक करत आहात, आता बघा मी काय करतो, असे म्हणत ब्लेडने डाव्या हातावर वार करून शिरा कापण्याचा प्रयत्न करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सहायक पोलीस फौजदार ए.डी.जाधव अधिक तपास करीत आहेत.