Breaking News

भोग सरेना! कोठडीत 13 एप्रिलपर्यंत वाढ भुजबळांच्या गोटात कमालीची अस्वस्थता; विरोधकांमध्ये चैतन्य

भोग सरेना! कोठडीत 13 एप्रिलपर्यंत वाढ
भुजबळांच्या गोटात कमालीची अस्वस्थता; विरोधकांमध्ये चैतन्य
मुंबई, दि.1 - कथित विकास पुरूष आणि महाराष्ट्राचा बाहुबली नेता छगन भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत 13 एप्रिलपर्यंत वाढली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे भुजबळ समर्थक कार्यकर्ते आणि भ्रष्ट साबांअभियंत्यांच्या उरात धडकी भरली असून भुजबळ विरोधकांमध्ये चैतन्य पसरले आहे. दरम्यान, भुजबळांच्या नाशिक या बालेकिल्ल्यात भुजबळ नॉलेज सिटी आणि भुजबळ फार्म परिसराशी संबंधित आप्तस्वकीयांमध्येही घबराट पसरली आहे.
मनी लॉन्ड्ररींग आणि महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी ईडीने अटक केल्यानंतर छगन भुजबळ  यांना 31 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीची मुदत संपत असल्यामुळे त्यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यावर सुनावणी करतांना न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत 13 एप्रिलपर्यंत वाढविली. त्यांचा पुतण्या समीर भुजबळ देखील याच प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे.
दरम्यान, मंगळवारी ईडीने मनी लाँडरींग कायद्यान्वये सत्र न्यायालयात 11 हजार 150 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. इतकेच नाही तर एसीबीने देखील दोन दिवसांपूर्वीच कलिनातील वाचनालय गैरव्यवहार प्रकरणी भुजबळांवर आरोपपत्र दाखल केले होते. ईडीने सत्र न्यायालयापुढे दाखल केलेल्या आरोपपत्रांमध्ये 30 साक्षीदारांचा समावेश आहे. दोन्ही तपास यंत्रणांनी दाखल केलेले जवळपास 28650 (एकत्रित) पानांचे आरोपपत्र आणि भुजबळांच्या न्यायालयीन कोठडीत झालेली वाढ या पार्श्‍वभूमीवर भुजबळांच्या मजबूत मानला जाणार्‍या किल्ल्यालाही हादरे बसू लागले आहे. भुजबळांच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरली असून साबांतील त्यांच्या समर्थक अभियंत्यांना अटकेची चिंता सतावत आहेत. याउलट गृहमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचा पद्भार सांभाळत असतांना भुजबळ आणि त्यांच्या बगलबच्च्यांच्या करणीचे बळी ठरलेल्या विरोधकांमध्ये दिवाळी साजरी केली जात आहे. दरम्यान, महाराष्ट्र सदनात 870 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका भुजबळांवर ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय मुंबईतील आरटीओ इमारतीचे बांधकाम, नवी मुंबईतील हेक्सा वर्ल्ड प्रकल्पातील कथित गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून समीर भुजबळ आणि त्यानंतर छगन भुजबळ यांची चौकशी करण्यात आली होती. त्या आधारावर ईडीकडून आरोपपत्र तयार केले आहे. त्याचबरोबर पुरावे आणि माहितीसह एकूण 11 हजारांहून अधिक कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. या प्रकरणी ईडीने आतापर्यंत भुजबळांच्या 131.86 कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. बाजारभावानुसार या मालमत्तांची किंमत 300 कोटींहून अधिक आहे.
देबडवार-हांडे-चव्हाण अस्वस्थ
अनेक भ्रष्टाचारांमधील गॉडफादर बंदिस्त झाल्याने मुख्यअभियंता उल्हास देबडवार, अधिक्षक अभियंता रणजीत हांडे, अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण यांच्या तंबूतही घबराट पसरली आहे. उपलब्ध माहितीनुसार एसीबी आणि ईडीचे पथक कुठल्याही क्षणी या क्षेत्रीय अभियंत्यांच्या दारावर चौकशीची थाप मारू शकते. या चिंतेनेच त्यांची झोप उडाली असून सुरक्षित बिळाचा शोध सुरू झाल्याची चर्चा आहे.