फिरते मासे विक्री वाहनासाठी 10 लक्ष रूपये अनुदान
बुलडाणा (प्रतिनिधी) । 27 - शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपाय योजनांमधील शेतकरी गटाला मासळी विक्रीसाठी वाहन देण्याची योजना शासनाने आणली. मत्स्यव्यवसाय विभाग पाच शेतकर्यांच्या एका गटाला फिरते मासे विक्रीसाठी वाहनाला 10 लक्ष रूपये अनुदान देणार आहे. तसेच वाहनासोबत मासे तळण्यासाठी व शिजविण्यासाठी गॅस, भांडी तसेच मासे साठवणूक करण्याकरिता शितपेटी वाहनासोबत देण्यात येणार आहे.
अल्प भूधारक, अत्यल्प भूधारक शेतकर्यांचा गट बनवून जिल्ह्यातील 18 ते 60 वर्ष वयोगटासतील पाच शेतकर्यांचा एक गट याप्रमाणे सदर वाहन देण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थी गटाकडून विहीत नमुन्यात व विहीत कालावधीत अर्ज मागविण्यात आले होते. योजनेचा लाभ दोन हेक्टर जमीन धारणा असलेल्या शेतकर्यांना देण्यात येईल. तसेच महिला बचत गटाला यामध्ये प्राधान्य देण्यात येणार असून वाहनाची देखभाल, डिझेल खर्च व वाहनचालकाचा भार लाभार्थ्यांना उचलावा लागणार आहे. योजनेच्या लाभासाठी गटातील पाचही लाभार्थ्यांचे 7/12 उतारा असणे आवश्यक आहे व एक प्रशिक्षित वाहनचालक असावा लागणार आहे. यासंदर्भात जिल्ह्यातून पाच लाभार्थी गटांची निवड करावयाची आहे. पात्र आणि अपात्र लाभार्थी गटांची यादी, प्रशासकीय इमारतीमधील सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय यांचे कार्यालयातील सूचना फलकावर, संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र लाभार्थी गटातून पाच लाभार्थी गटांची निवड करण्यास लकी ड्रॉ पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. सदर लकी ड्रॉ काढण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी तथा समिती अध्यक्ष, अंमलाजावणी व सनियंत्रण समिती यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे, असे सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय यांनी कळविले आहे.