Breaking News

नारायण राणे यांचे शिवसेनेवर टीकास्त्र

सिंधुदुर्गनगरी, दि. 18, जानेवारी - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नाणारमधील ग्रीन रिफायनरीबाबत शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर सडकून टीका केली. मालवण येथील निलरत्न निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना नारायण राणे यांनी उद्योगमंत्री शिवसेनेचा असताना शिवसेनेची नेतेमंडळी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी नाणारला का जातात असा सवाल उपस्थित केला. नाणारमध्ये नेते मंडळी येतात, आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सांगतात मात्र एकीकडे विरोध क रायचा व दुसरीकडे या कामाचे ठेके घ्यायचे अशी दुटप्पी भूमिका शिवसेनेची आहे. 

याआधी एन्रॉन आणि जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाला प्रथम विरोध केला होता. शिवसेनेची भूमिका नेहमीच दुटप्पी राहिली असल्याची टीका नारायण राणे यांनी केली.लवकरच नाणारमध्ये सभा घेऊन शिवसेनेचा खरा चेहरा उघडकीस आणणार असल्याचा इशारा ग्रीन रिफायनरीवरील शिवसेनेच्या भूमिकेबाबत बोलताना नारायण राणे यांनी दिला.’जिल्ह्यातील विकासकामे रखडविण्यात छुपे हात आहेत’ या पालकमंत्र्यांच्या विधानाचा समाचार घेताना नारायण राणे यांनी ’नाचता येईना अंगण वाकडे’ अशी स्थिती पालकमंत्र्यांची असून जिल्ह्याच्या विकास कामांसाठी करोडो रुपयांचा आणलेला निधी त्यांनी दाखवून द्यावा आणि त्यांनी आणला असेल तर जिल्हाधिकार्‍यांनी तो जाहीर करावा असे आव्हान नारायण राणे यांनी दिले.