Breaking News

धर्मा पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी ,मंत्रालयात विष प्राशन करून केला होता आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : मंत्रालयात विष प्राशन केलेले धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली. वयाच्या 80 व्या धर्मा पाटील यांनी जेजे रूग्णालयात अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरू होते. धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील रहिवाशी होते. औष्णिक वीज प्रकल्पात पाटील यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र, त्यांना मात्र पाच एकराच्या बदल्यात केवळ चार लाख रुपये इतकीच भरपाई देण्यात आली. हा मोबदला योग्य नसल्याने वीज प्रकल्पासाठी जमीन संपादित करणार्‍या यंत्रणेकडून दुजाभाव झाल्याचा आरोप करीत धर्मा पाटील यांनी 22 जानेवारी रोजी मंत्रालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सेंट जॉर्ज रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन वेळा धर्मा पाटील यांचे डायलिसीस करण्यात आले होते.


धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यात रहिवाशी. धुळे जिल्ह्यात होणार्‍या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली. धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची 600 झाडं होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ 4 लाखांचा मोबदला देण्यात आला. इतर शेतकर्‍यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला. 

मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तरे मिळत नसल्याने त्यांनी विषप्राशन केले. धर्मा पाटलांच्या विषप्राशनानंतर जाग आलेल्या सरकारने पाटील यांच्या कुटुंबियांना 15 लाखाचे सानुग्रह अनुदान देऊ केले. मात्र अनुदान नको, आम्हाला मोबदला द्या, अशी मागणी लावून पाटील कुटुंबाने धरली होती.
दरम्यान, धर्मा पाटील यांच्या निधनाला सरकार जबाबदार असल्याचे सांगत काँग्रेस व शिवसेनेने धुळ्यातील दोंडाईचा-विखरण रस्त्यावर निषेधार्थ रास्तारोको आंदोलन केले. धुळे जिल्ह्यातील वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांना न्याय मिळाला पाहिजे, या मागणीसाठी स्वाभिमानी आणि बळिराजा या दोन्ही शेतकरी संघटनांनी दोन्ही शेतकरी संघटनांनी सोमवारी कराडमध्ये रास्ता रोको केला.

लेखी आश्‍वासनांनतर मृतदेह घेतला ताब्यात राज्य सरकारने धर्मा पाटील यांच्या मुलाला लेखी आश्‍वासन दिले आहे. जमिनीचे फेरमूल्यांकन करुन पंचनाम्यानुसार जो मोबदला येईल तो व्याजासह 30 दिवसात देऊ, असे सरकारच्यावतीने म्हटले आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतचे पत्र धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र यांना दिले. जोवर योग्य मोबदल्याचे लेखी आश्‍वासन मिळत नाही, आणि धर्मा पाटील यांना शहीद शेतकरी घोषित करत नाही, तोवर आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असे म्हणत नरेंद्र पाटील यांनी मुंबईतील जे जे रुग्णालयाबाहेर आंदोलन सुरु केले होत, मात्र ऊर्जामंत्र्याच्या लेखी पत्रानंतर त्यांनी मृत्यदेह ताब्यात घेतला.