Breaking News

पुण्यातील तरुणी काश्मिरात सुसाइड बॉम्बर


पुणे : इसिसच्या संपर्कात असलेली येरवडा परिसरात राहणारी 18 वर्षीय तरुणी शहरातून पसार झाली असून जम्मू-काश्मिरात ती सुसाइड बॉम्बर म्हणून बॉम्बस्फोट घडवू शकते, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी पोलिसांना दिला आहे. जम्मू-काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक मुनीर खान यांनी राज्यातील पोलिस ठाण्यांना परिपत्रक काढून प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत.संशयित तरुणी सोशल मीडियाद्वारे 2 वर्षांपूर्वी इसिसच्या संपर्कात आली होती. ती इसिसमध्ये भरती होण्यापूर्वीच एटीएसच्या रडारवर आली. तिचे पोलिस व मौलवींकडूनही समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर पोलिस व एटीएसने काही दिवस तिच्यावर नजर ठेवली. मात्र, काही दिवसांपूर्वी ती पुण्यातून गायब झाली आहे. गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनंतर पुणे पोलिसांनी तिच्या घरी जाऊन चौकशी केली. तिला शिक्षणाकरिता अज्ञात ठिकाणी ठेवल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिल्याचे सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम यांनी सांगितलेे.