Breaking News

येत्या 48 तासांत राज्यात थंडीची लाट हवामान विभागाचा अंदाज


पुणे : येत्या 48 तासांत राज्यात बहुतांश ठिकाणी थंडीची लाट येणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. येत्या 2-3 दिवसांत संपूर्ण राज्यात वातावरण कोरडे राहणार असून आकाश निरभ्र असणार आहे. त्याच्या जोडीला उत्तरेकडून अतिथंड आणि कोरडे वारे वाहणार असून यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही शहरांमध्ये हुडहुडी भरवणारी थंडी पडेल, असेही नमूद करण्यात आले आहे. उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर येथे हिमवर्षाव झाला असून राजधानी दिल्लीत 8.8 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील अनेक शहरांतील नागरिक बोचर्‍या थंडीने अक्षरशः गारठून गेले. निच्चांकी किमान तापमानाची नोंद नाशिक येथे 7.2 अंश सेल्सिअस एवढी करण्यात आली. तर नगर 7.5, पुणे 9.9, मुंबई 15.1, जळगाव 9.4, रत्नागिरी 16.9, कोल्हापूर 16, सांगली 13.7, सातारा 11.9, सोलापूर 13.9, औरंगाबाद 9.2, नागपूर 10 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट तर कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी नमूद केले.