Breaking News

बस नदीत कोसळून 13 जणांचा मृत्यू कोल्हापूरातील पंचगंगा नदीत कोसळली बस


कोल्हापूर : शिवाजी पुलावरून एक मिनी बस पंचगंगा नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. तर, या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बसचालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने शिवाजी पुलाचा कठडा ओलांडून बस 100 फूट खाली पंचगंगा नदीत कोसळल्याने ही घटना घडली. रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये 6 पुरुष व 7 स्त्रियांचा समावेश आहे. त्यापैकी 16 वर्षाखालील 7 मुले-मुली आहेत. अपघातातील सर्वजण पुणे-पिरंगुट येथील रहिवाशी आहेत. गौरी वरखडे (वय 16), ज्ञानेश्‍वरी वरखडे (वय 14), संतोष वरखडे (वय 45), साहील केदारी (वय 14), निलम केदारी (वय 28), भावना केदारी (वय 35), सचिन केदारी (वय 34), संस्कृती केदारी (वय 8), श्रावणी केदारी (वय 11), सानिध्य केदारी (10 महिन्यांचे बाळ), प्रतिक नांगरे (वय 14), छाया नांगरे (वय 41), बसचालक (वय 28), अशी मृतांची नावे आहेत. तर, या अपघातात प्राजक्ता दिनेश नांगरे, मनिषा संतोष वरखडे आणि मंदा भरत केदारी या तीन महिला जखमी झाल्या असून त्यांना सीपीआर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील बालेवाडी येथील भरत केदारी यांचे कुटुंब मिनी बसने (क्रमांक-एमएच-12 एनएक्स 8550) गणपतीपुळेला देव दर्शनासाठी गेले होते. देव दर्शन आटपून हे सर्व जण पुण्याकडे परतत होते. याच दरम्यान मिनी बस शिवाजी पूल येथे आल्यानंतर बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने ही बस पुलाचा कठडा तोडून 100 फूट उंचीवरुन नदीत कोसळली आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, फायरब्रिगेड, घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्य सुरु केले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील यांनी सीपीआर रूग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली.