Breaking News

मैत्रेयी ग्रुपमुळे वाचन संस्कारास नवसंजीवनी - शारदा पाटील


पाथर्डी /शहर प्रतिनिधी/- मैत्रेयी ग्रुप मुळेच पाथर्डी सारख्या शहरात वाचन संस्कृतीस नवसंजीवनी मिळाली असे वक्तव्य शरद नामदेव पाटील यांनी केले. त्या मैत्रेयी ग्रुप संचालित मोबाईल वाचनालयाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होत्या. 
आपल्या भाषणात त्या पुढे म्हणाल्या की,अलीकडे वाचन संस्कारच घराघरातून हरवत चालले आहे. अगदी बालवयापासूनच परीक्षा आणि त्यात मिळणारी टक्केवारी यालाच अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे, त्यामुळे पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त अन्य साहित्य वाचन करण्याची प्रवृत्तीच नष्ट होत चालली आहे. शहरी जीवनाबरोबरच ग्रामीण जीवनातही मोबाइल, इंटरनेट या सुधारित तांत्रिक युगाचा परिणाम दिसू लागला असून, प्रत्येकाची सुरुवातच सकाळी मोबाइल गजराने होत असल्याचे आपणास पहावयास मिळते. आभासी दुनियेत वावरणाऱ्या या पिढीला वास्तवाची जाणीव करून देण्याची क्षमता फक्त पुस्तकातच असून सुसंस्कृत नागरिक बनण्यासाठी पुस्तकांशिवाय पर्याय नाही. सध्या वाचन संस्कृती लोप पावत चालली असल्याची ओरड जाणकार व्यक्तींबरोबरच सर्व सामान्यांकडून होत आहे. अशा पार्श्वभूमीवर मैत्रेयी ग्रुपचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.

याप्रसंगी मैत्रेयी ग्रुपच्या अध्यक्ष कविता अभय आव्हाड, ज्योती मंत्री, अश्विनी केकाण, छाया लाहोटी, ज्योती गर्जे, मोनिका गुगळे, मीना मंत्री तसेच मैत्रेयी ग्रुपच्या सदस्य व पाथर्डी शहरातील महिला उपस्थित होत्या. यावेळी मैत्रेयी ग्रुपच्या अध्यक्षा कविता आव्हाड यांनी मोबाईल वाचनालय तसेच ग्रुपच्या इतर उपक्रमाविषयी माहिती सांगितली. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात वाण म्हणून सदस्यांना पुस्तके भेट देण्यात आली.