Breaking News

राहाता तहसीलच्या शौचालयाची दुरवस्था महिला कर्मचाऱ्यांची कुचंबणा


शिर्डी/प्रतिनिधी :- राहाता तहसीलला रोज ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर शासकीय कामाच्या निमित्ताने येजा करतात. मात्र पिण्याचे पाणी त्याबरोबरच सार्वजनिक स्वच्छता गृहाची (मुतारी) व शौचालयाची अतिशय दुरावावस्था झाली आहे. सर्वत्र दुर्गंधी, तुटलेली पाईपलाईन हे पाहिल्यानंतर तहसीलच्या कर्मचारी आणि नैसर्गिक विधीसाठी जायचे तरी कोठे, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.  शौचालयाच्या या दुरावस्थेमुळे महिला वर्गाची मोठी कुचंबना होत आहे. इतक्या मोठ्या इमारतीला लागलेले दुरवस्थेच्या ग्रहणाकडे संबंधित अधिकारी का दुर्लक्ष करतात, हा मोठा प्रश्न आहे. 
राहाता तालुक्याचे तहसीलदार माणिक आहेर यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून जनहिताच्या कामाला प्राधान्य दिले आहे. शेवटच्या वंचित घटकाला शासकीय योजनेचा फायदा कसा देता येईल, यासाठी त्यांनी कामातून ठसा उमटविला आहे. अर्थात ही समाधानाची बाब आहे. मात्र असे असले तरी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली ३ मजली भव्य इमारत उभी करण्यात आली. त्याठिकाणी विविध शासकीय कार्यालये सुरु करण्यात आली. त्यात कृषी पंचायत समिती, भूमी अभिलेख, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग या कार्यालयांना जागा देण्यात आली. नागरिकांची कामे एकाच ठिकाणी मार्गी लागावी, हा यामागचा हेतू होता. मात्र बंद पडलेले लिफ्ट, पिण्यासाठी नसलेले पाणी, सार्वजनिक स्वच्छता गृह व शौचालयाची दुरवस्था, याकडे होणारे दुर्लक्ष सर्वांचीच डोकेदुखी ठार आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी हा प्रश्न तातडीने मार्गी लागावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.