Breaking News

नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणारा अटकेत


पुणे, दि. 18, जानेवारी - जलसंपदा विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 16 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी गडचिरोली येथील एकाला अटक केली. त्याला 20 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी.टी. गोटे यांनी दिला आहे.प्रमोद पांडूरंग मुनगीलवार (रा. अनंतपुर पो. रेखेगाव, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याबाबत बंडूजी मोतीराम रामटेके (60, रा. भिवापूर, पा. वालसरा, गड चिरोली) यांनी फिर्याद दिली आहे. मुनगीलवार आणि त्याचा साथीदार खान, चंद्रकांत ओंबळे आणि त्याचा मुलगा रशी ओंबळे यांनी संगणमत करून रामटेके यांच्या मुलास व इतरांना जलसंपदा विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यांच्याकडून प्रत्येकी चार लाख रुपये व इतर खर्चासाठी 60 हजार असे मिळून 16 लाख 60 रुपये घेऊन नोकरी न लावता फसवणूक केली. याप्रकरणी मुनगीलवार याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी साथीदारांच्या शोधासाठी, फसवणुकीची रक्कम हस्तगत क रण्यासाठी, त्यांनी आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याबाबत तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.