Breaking News

राजमाता जिजाऊ मिशनच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ


राज्यातील आदिवासी, दुर्गम, आणि ग्रामीण भागासह राज्यातील शहरी भागही कुपोषणमुक्त करण्याचा निर्धार आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला. राज्य शासनासह युनिसेफ, टाटा ट्रस्ट्स, फाईट हंगर फाऊंडेशन आदी विविध संस्था यासाठी पुढे आल्या आहेत. आज झालेल्या कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य व पोषण मिशनच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला. याशिवाय यावेळी विविध संस्थांबरोबर पोषण, आरोग्य आणि कुपोषण मुक्तीबाबत विविध सामंजस्य करार करण्यात आले.

पोषण, बालकांच्या हाताळणीविषयक शिक्षण गरजेचे – मंत्री पंकजा मुंडे
महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या, संपूर्ण महाराष्ट्र राज्य कुपोषण मुक्त करण्यासाठी राज्य शासनाने मोठा पुढाकार घेतला आहे. राजमाता जिजाऊ मिशनच्या तिसऱ्या टप्प्याचा आज शुभारंभ करण्यात आला असून शासनाने यासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. युनिसेफ आणि टाटा ट्रस्ट्स या कामी योगदान देत आहे. राज्यात बालमृत्यूचा दर मागील काही वर्षात वेगाने कमी झाला असून तो शून्य करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यासाठी प्रभावी उपाय योजना राबवू, असे त्यांनी यावेळी सांगितले.