Breaking News

प्रांताधिकारी यांची मध्यरात्रीतुन वाळुमाफियांवर कारवाई जेसीबी पाण्यात सोडुन पळालेला चालक व मालक अखेर शरण

कुळधरण /प्रतिनिधी । 21 ः कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी खुर्द येथील लोहकरा नदीतुन होत असलेल्या, वाळु उपशावर प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी रविवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास स्वतः कर्मचार्‍यांसमवेत जावून कारवाई केली. कारवाई दरम्यान वाळूउपसा करणार्‍या जेसीबीचा चालक पाण्यात जेसीबी सोडून पळून गेला. मात्र अर्चना नष्टे यांनी पथकासह तेथेच पहारा दिल्याने वाहन चालक व मालक यांनी तेथे हजेरी लावली. महसूल कर्मचारी यांचेकडुन पाण्यातील जेसीबी ताब्यात घेवून कर्जत पोलीस स्टेशनला आणण्यात आले.


राक्षसवाडी खुर्द येथील लोहकरा नदीतुन होत असलेल्या, वाळू उपशावर दै. लोकमंथनने 6 जानेवारीच्या अंकात लोहकरा नदी पात्रातुन होतोय अनधिकृत वाळू उपसा या मथळ्याखाली सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. कर्जत- श्रीगोंदा तालुक्यांच्या सिमेवरील नदी पात्रातून होत असलेल्या वाळू तस्करीकडे दै. लोकमंथनने लक्ष वेधले होते. वाळू माफिया स्थानिक लोकांना दमदाटी, शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देत असल्याची बाब जनतेसमोर आणली होती. सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पावणे व गुंगा कोपनर यांनी या प्रकाराबाबत प्रशासनाला कळविले होती. अखेर महसूल विभागाने दखल घेत कारवाई करीत वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्या.

या कारवाईत प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांचे पथकात तलाठी मोहसिन शेख, विश्‍वास राठोड, नंदकुमार गव्हाणे यांनी सहभाग घेवून वाळू तस्करांवर धडक कारवाई केली. या कारवाईत वाळू उत्खनन केल्याचा पंचनामा, जेसीबी मालकाला केलेला दंड व कारवाईबाबतची माहिती समजू शकली नाही. प्रांताधिकारी यांना दुरध्वनीवरुन संपर्क केला मात्र संपर्क होवू शकला नाही.यापूर्वी बाभूळगाव दुमाला येथेही तब्बल 7 तास तळ ठोकून प्रांताधिकारी यांनी वाळू उपसा करणारा जेसीबी जप्त केला होता. मात्र सध्या भीमा नदी पात्रातून होत असलेल्या बेसुमार वाळू उपशावर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागून राहिले आहे.