Breaking News

कुकडीच्या पाण्यासाठी शेतकर्‍यांचा रास्तारोको.


जामखेड / ता. प्रतिनिधी । 21 ःतालुक्यासाठी कुकडीचे पाणी मिळावे यासाठी, आपले आयुष्य वाहून घेतलेले स्वर्गीय सामाजिक कार्यकर्ते व पं. समितीचे मा. सभापती डॉ. पी. जी. गदादे यांना जाऊन 2 वर्षे पूर्ण झाली तरीदेखील या सरकारने तालुक्याला कुकडीचे पाणी दिलेच नाही, त्यामुळे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज अरणगाव येथील शेतकर्‍यांच्या वतीने जामखेड - श्रीगोंदा रोडवरील अरणगाव येथे रास्तारोको आंदोलन करुन श्रध्दांजली वाहीली. अरणगाव येथील रहिवासी असलेले स्वर्गीय पी. जी. गदादे यांनी जामखेड तालुक्याला कुकडीचे पाणी मिळावे, यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून लढा दिला होता. मात्र त्यांचे हे स्वप्न अपुर्ण राहिले होते.त्यांच्या जाण्याला आज 2 वर्षे पूर्ण झाली, त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने दि. 20 जानेवारी रोजी सकाळी 11 वा. अरणगाव येथे श्रध्दांजलीपर कार्यक्रम व रास्तारोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. सदरचे आंदोलन मा. जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक अमित जाधव शेतकरी संघटनेचे नेते अंबादास राऊत, मा. सरपंच संतोष निगुडे, पांडुरंग सोले, राजु वारे, अजिनाथ नन्नवरे, कारभारी गदादे, शंकर गदादे, विनोद कापरेसह शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनकर्ते माजी जि. प. सदस्य मधुकर राळेभात बोलताना म्हणाले की, कुकडीचे पाणी जामखेड तालुक्याला मिळावे म्हणून, स्व. डॉ. पी. जी. गदादे यांनी अनेक वेळा उपोषणे केली होती. तालुक्याला कुकडीचे पाणी मिळावे, तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश करावा, आणेवारी पन्नास पैशापेक्षा कमी करावी, चारा छावण्या सुरू कराव्यात म्हणून अनेक वेळा आंदोलने केली. तसेच स्व. डॉ. गदादे यांनी जामखेड तालुक्याला हक्काचे पाणी मिळावे, म्हणून त्यांनी उभारलेला लढा उल्लेखनीय ठरला होता. याप्रश्री 11 जुलै 2001 रोजी तब्बल 82 शेतक-यांसह जेलभरो आंदोलन केले. यामध्ये त्यांना विसापूर जेलमध्ये तुरूंगवास भोगावा लागला होता.त्यानंतर याप्रश्री 27 जुलै 2001 रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर 200 शेतकर्‍यांसह एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. हळगाव येथील कृषी महाविद्यालयाच्या भूमीपूजनावेळी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जामखेड तालुक्याला कुकडीचे पाणी देण्याचे आश्‍वासन दिले आहे, मात्र तोपर्यंत वाट पहात बसावे लागणार आहे. या नंतर स्वर्गीय मा. सभापती डॉ. पी.जी. गदादे यांना श्रद्धांजली वाहून तहसीलदार यांना निवेदन देऊन रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.