Breaking News

शिक्षकांच्या अभियोग्यता चाचणीत एक लाख ७१ हजार उमेदवारांचा सहभाग


राज्यातील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षकांच्या नियुक्तीसाठी घेण्यात आलेल्या अभियोग्यता चाचणीमध्ये एक लाख 71 हजार 348 उमेदवारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या चाचणीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्राच्या गुणवत्ताकरणाचे नवे पर्व सुरू झाले असून गुणवंत शिक्षकांची निवड होण्यासह शिक्षक निवडीच्या प्रक्रियेत होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसणार आहे. यापुढे ही चाचणी आधार मानून राज्यातील शासकीय, शासन अनुदानित आणि खाजगी शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीच्या आधारे गुणवत्ताधारक शिक्षकांची पारदर्शक पद्धतीने निश्चित कालावधीत निवड होणार आहे.
गेल्या तीन वर्षात राज्य शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांमुळे शैक्षणिक क्षेत्रात अंतर्बाह्य परिवर्तन घडत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी महाराष्ट्र शैक्षणिक प्रगत अभियान, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा आणि शाळांचे डिजिटायजेशन यासारख्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याचाच महत्त्वाचा टप्पा म्हणून गुणवत्तापूर्ण शिक्षकांचा शिक्षण व्यवस्थेत समावेश व्हावा आणि शिक्षक भरतीतील गैरप्रकारांना चाप लागावा यासाठी शासनाने अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्याचा निर्णय घेतला होता. या चाचणीला राज्यातील उमेदवारांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.