Breaking News

चोरट्यांच्या मारहाणीत वृद्ध महिलेचा मृत्यू ?

पाथर्डी /प्रतिनिधी/- पाथर्डी शहरातील मध्यभागी गजबजलेल्या अष्टवाडा भागातील दुर्गा ओंकार कोष्टी ( वय ६०) यांचा सोमवारी रात्री ११.३० ते मंगळवारी सकाळी ७ च्या दरम्यान चोरी करण्यासाठी आलेल्या अज्ञात चोरट्याचा मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवार,३० जानेवारीला घडली. पाथर्डी पोलीस स्टेशन मध्ये या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत प्राथमिक समजलेली माहिती अशी की, दुर्गा कोष्टी या होमगार्ड मध्ये काम करत होत्या तर त्यांचे पती हे कलेक्शन चे काम करतात. दुर्गा कोष्टी यांना दोन मुले असुन ते नोकरीसाठी बाहेरगावी असतात. त्या नेहमी मुलांकडेच रहात असत. त्या दोन दिवसापूर्वी मुलांकडून नाशिक येथून पाथर्डी येथे आल्या होत्या. सोमवारी रात्री जेवन करुन त्यांचे पती घरातील पुढच्या रूम मध्ये आणि दुर्गा कोष्टी या मागील रूम मध्ये झोपल्या होत्या. सकाळी ७ वाजता पती ओंकार कोष्टी हे त्यांना उठवायला गेले असता त्यांना वरील प्रकार लक्ष्यात आला. त्यानंतर घटनास्थळी पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी धाव घेतली. आणि त्यांनी आपल्या वरिष्ठांना घडलेल्या प्रकारची माहिती दिली. घटनास्थळी प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया (अहमदनगर,ग्रामीण) व उपविभागीय पोलीस अधिकारी पौर्णिमा तावडे, स्थनिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शरदचंद्र गोर्डे यांनी घटनास्थळी येऊन सर्व बाजूची विचारपूस केली. तसेच आसपासच्या सर्व परिसराची बारकाईने पाहणी करत पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांना तपासासंबधी योग्य त्या सूचना दिल्या. तर खुनाचा पुरावा शोधण्यासाठी श्वान पथक व फोरेन्सिक लॅब डिपार्टमेंट सुद्धा दाखल झाले होते.

दरम्यान या चोरीमध्ये घरातून कोणतीही वस्तू चोरीस गेली नसल्याने पोलिसांना कोष्टी यांचा मृत्यू संशयास्पद वाटत आहे. दुर्गा कोष्टी यांच्या उजव्या बाजूने कानाखाली डोक्यात अज्ञात शस्त्राने घाव घालून त्यांचा खून झाला आहे. तसेच मयत दुर्गा कोष्टी यांच्या गळ्यावर ओरखडल्याचे निशाण असून चोरट्यांनी घरातील सामानाची उचकापाचक केल्याचे सांगण्यात येते. परंतु मयत दुर्गा कोष्टी यांच्या गळ्यातील, कानातील, पायातील दागिण्याची चोरी झालेली नसल्याने पोलिसांनाही कोष्टी यांच्या मृत्यूबाबत संशय वाटत आहे. घटनास्थळी पोलीस पथकाने श्वानामार्फत चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु श्वान घरातच घुटमळले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, घटना ज्या ठिकाणी घडली त्याचा मागच्या बाजूस मध्यरात्री १.३८ वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीची कोष्टी यांच्या घराच्या रोडने संशयास्पद हालचाल करत असतांना सीसीटीव्हीत कैद झाली. नंतर तोच संशयित इसम दोन तासांनी हातात काही तरी घेऊन पुन्हा परत जाताना आढळून आला आहे.