Breaking News

देशात आणीबाणी सदृश्य परिस्थिती : यशवंत सिन्हा

नवी दिल्ली : सध्या देशात आणीबाणी सदृष्य परिस्थिती निर्माण झाली असल्याची टीका माजी अर्थमंत्री आणि भाजपचे नाराज नेते यशवंत सिन्हा यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी सरन्यायाधीशांबाबत उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या पार्श्‍वभूमीवर सिन्हा यांनी पत्रकार परिषद घेऊन, सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला.


या शिवाय, ज्या ठिकाणाहून लोकशाहीला धोका निर्माण होत आहे, त्याविरोधात सर्वांनी उभे रहायला हवे आणि लोकशाही वाचवायला हवी, असे आवाहनही सिन्हा यांनी यावेळी केले. 
चार न्यायमूर्तींच्या पत्रकार परिषदेतील मुद्द्यांचा संदर्भ देऊन यशवंत सिन्हा म्हणाले की, जर चार न्यायमूर्ती जनतेसमोर येत असतील, तर हे प्रकरण केवळ सर्वोच्च न्यायालयापुरते मर्यादित नाही. 

वास्तविक, हा गंभीर विषय आहे. ज्याला कुणाला देशाच्या आणि लोकशाहीच्या भविष्याबद्दल काळजी वाटते, त्यांनी चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवला पाहिजे. विशेष म्हणजे, यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्र्यांचाही चांगलाच समाचार घेतला. आपण बोललो तर आपली खुर्ची जाईल, या भीतीपोटी केंद्रातले मंत्रीदेखील गप्प आहेत, असा आरोप यशवंत सिन्हांनी यावेळी केला. जर सर्वोच्च न्यायालयच तडजोडीवर चालत असेल, तर लोकशाही धोक्यात असल्याचे समजले पाहिजे, त्यामुळे चारीही न्यायमूर्तींनी दिलेले संकेत समजून घेऊन, न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे, अशीही मागणी सिन्हा यांनी यावेळी केली.