Breaking News

गडाखांच्या अमृतमहोत्सवात हजारोंची मांदियाळी


सोनई प्रतिनिधी :- समाजकारण, राजकारण अशा सर्वच क्षेत्रातील लोकांनी सध्या आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आताची शेतीसंस्कृती आणि कुटूंब व्यवस्था पहाता प्रेमळपणा, आदर, आस्था पूर्वीसारखा राहिला नाही. पाश्चात्य चंगळवादी संस्कृतीचे वादळ सर्वत्र घोंगावते आहे. त्यात सावरण्यासाठी रामायण आणि महाभारत ग्रंथांचे वाचन उपयुक्त ठरणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, माजी खा. यशवंतराव गडाख यांनी केले.
येथील यशवंत सामाजिक प्रतिष्ठानने गडाख यांच्या अमृतमहोत्सवी गौरव सोहळ्यानिमित्त सोनईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कृतज्ञता पुरस्कारप्राप्त सत्कारमूर्ती अण्णा हजारे, ना. धों. महानोर, रामदास फुटाणे आदींसह ज्येष्ठ साहित्यिक मधुमंगेश कर्णिक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी, खजिनदार सुनीताराजे पवार, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, बबनराव पाचपुते व हर्षवर्धन पाटील, आ. जयंत पाटील, शिर्डी देवस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, माजी आ. नरेंद्र घुले, डाॅ. शरद कोलते, बन्सीभाऊ म्हस्के, उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एस. बी. देशमुख, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, उदय निरगुडकर, अभिनेते रमेश भाटकर, चित्रपट निर्माते नागराज मंजुळे आदी उपस्थित होते. 

यावेळी यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे कृतज्ञता पुरस्कार गडाख यांच्या हस्ते कवी ना. धों. महानोर, रामदास फुटाणे आणि अण्णा हजारे यांना प्रदान करण्यात आले. गडाख यांना अमृतमहोत्सवानिमित्त देण्यात आलेल्या वटवृक्षाच्या प्रतिकृतीवरील मानपत्राचे वाचन संजीव तनपुरे यांनी केले. हे मानपत्र वटवृक्षाच्या खोडावर कल्पकतेने शब्दांकित करण्यात आले होते. 

सत्काराला उत्तर देताना गडाख म्हणाले, हल्ली मोबाईल आणि इंटरनेटचा अतिरेक होतो आहे. अशा परिस्थितीत समाज अभिसरणाची प्रक्रिया भाषणे देऊन होत नाही. ती स्वतःपासून सुरू करावी लागते. त्यासाठीच मी माझ्या मुलांच्या विवाहात डामडौल न करता सामुदायिक विवाह पध्दतीने विवाह केले. वडिलांचा १३ वा विधी न घालता दलितवस्तीत दोन शाळा खोल्या बांधल्या. काळानुसार समाज बदलत गेला तशी राजकीय परिस्थिती बदलली. आजचे राजकारण धनशक्तीने व्यापले असे बोलले जाते. राजकारणावरील बदनामीचा डाग काढण्याचे काम पुढील पिढीला करावे लागणार आहे. मानवी चेहरा नसल्यासारखे राज्यकर्ते वागले तर घाशीराम कोतवाल निर्माण होऊन दरिद्री माणसाला छळतील. सामाजिक परिवर्तन बंदुकीच्या गोळीने नव्हे तर लेखन व साहित्यानेच होऊ शकेल. समाजसुधारक, पत्रकार व विव्दानांनी राज्यकर्त्यांवर वाॅच ठेवण्याचे काम केले पाहिजे. आजच्या लोकशाहीत शहाणी मंडळी गोंधळलेल्या अवस्थेत तर मूर्ख मंडळी आपल्या मतांवर ठाम आहेत. निकोप लोकशाहीसाठी हे चित्र मारक आहे. वयाची पंचाहत्तरी म्हणजे कुणाबद्दलही मनात व्देष, ईर्षा, राग राहत नाही. झाडावरचे पिकले पान गळतेच. निसर्गाचा तो नियमच आहे. आम्ही उभी केलेली कामे नव्या पिढीने पुढे चालविली पाहिजेत. लोकसमुहाची सोबत घेऊन आयुष्याची वाटचाल केली पाहिजे. प्रशांत आणि शंकरराव यांच्यासह त्यांच्या मित्रांनी खूप सुंदर आयोजन केले. या कार्यक्रमाने मला जगण्याची व सामाजिक कामाची उर्मीच मिळाली.

कृतज्ञता पुरस्कारप्राप्त रामदास फुटाणे म्हणाले, यशवंतराव गडाख हे माणुसकीचा झरा असणारे व्यक्तिमत्व. निसर्ग व माणसावर प्रेम करणारे. कवी ह्रदयाचे. बहुजन समाजाची अभिरूची पुस्तक वाचनाने बदलावी, माणुसकी जपली जावी, यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले.

अण्णा हजारे म्हणाले, यशवंतराव गडाख यांचे जीवन बेदाग आहे. त्यांचे कार्य व साहित्य तरूणांना दीपस्तंभासारखे प्रेरणा देणारे आहे. अपमान पचविण्याची क्षमता, नम्रता व लिनता कार्यकर्त्यांमध्ये असावी लागते. ती गडाखांमध्ये आहे. समाजाला त्यांचा आधार वाटतो. अलीकडे एमबीएसारखे उच्च शिक्षण घेतलेले तरूण व्यसनाधिन झालेले दिसत असताना प्रशांत - शंकरराव हे जे काम करत आहेत, ते पाहून आशेचा किरण दिसतो. युवाशक्ती जागी झाली तर राष्ट्राचे उद्याचे भविष्य दूर नाही.

ना. धों. महानोर यांनी यशवंतराव गडाख यांच्या कार्याचा आढावा घेत सूनबाईला त्यांनी लिहिलेले पत्र वाचा, असे आवाहन करून 'अक्षरे चुरगाळता मी अमृताचे कुंभ प्यालो अन् उद्याच्या जीवनाची सांगता मी घेऊन आलो...'तसेच 'या नभाने या भुईला दान द्यावे...'या मार्मिक कवितांचे सादरीकरण केले. 

मधुमंगेश कर्णिक म्हणाले, कृतज्ञता हे अतिशय सुंदर मराठी मूल्य. यशवंतराव गडाख यांचा अमृतमहोत्सव म्हणजे मूल्य भावनेचा सन्मान. त्यांनी समाजपुरूषाचे मन जाणून त्याच्याशी समन्वय साधल्याने त्यांना लोकोत्तर कार्य करता आले. मन मोठे असेल तरच आभाळाएवढे मोठे होता येते.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, कला, क्रिडा, शिक्षण, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत असलेल्यांचा उत्तम समन्वय म्हणजे हा सोहळा आहे. आ. थोरात म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांचा वारसा पुढे चालवणाऱ्यांमध्ये यशवंतराव गडाख यांचे नाव वरच्या क्रमांकावर आहे. युवकांना दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करत राहिल, असे त्यांचे कार्य आहे.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे म्हणाले, आजच्या पिढीला अंतर्मुख करणारा हा कौटुंबिक सोहळा आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असलेल्यांची येथे मांदियाळी जमली आहे. कोणी कोणत्याही दिशेला असले तरी सर्व दिशा अमृतनगरीत स्थिरावल्या आहेत. आ. जयंत पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील अर्थकारण, प्रश्न, अडचणी, शेतकरी समस्या आणि सहकार चळवळ हा इतिहास यशवंतराव गडाख यांनी आपल्या धारदार लेखनीतून उद्याच्या पिढीसाठी लिहावा.

उदय निरगुडकर म्हणाले, यशवंतराव गडाख यांचा अमृतमहोत्सव ह्रदयात साठवून घेण्यासाठी मी येथे आलो आहे. समाजकारण हे त्यांच्या आयुष्याचे संचित असल्याने येथे 'यशवंत सागर' चे दर्शन झाले. राजकारण व समाजकारण ही युती साधलेले ते साहित्यिक राजकारणी आहेत. 

विजय कुवळेकर म्हणाले, जात, धर्म, पंथ याचा विचार न करता माणूस घडवण्यासाठी आयुष्यभर काम करून विधायकतेचे राजकारण यशवंतराव गडाख यांनी केले.

यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी प्रास्ताविक करताना या अमृतनगरीत प्रत्येकाला मनमुराद आनंद मिळाल्याचे सांगितले. ते म्हणाले, येथील प्रदर्शनांना भेटी दिलेल्या लोकांची संख्या पाच लाखांपर्यत आहे. सुशिक्षित तरूणांना प्रेरणा मिळावी, म्हणून माजी आ. शंकरराव गडाख यांच्या कल्पकतेतून औद्योगिक प्रदर्शन भरवले. या प्रदर्शनात पाच हजारपासून पंचवीस लाखापर्यतची मशीनरी होती. शंभरच्यावर मशीनरींची प्रात्यक्षिके झाली. उत्पादन होताना पाहून १२ कोटी मशीनरींची बुकींग झाली. सोनईसारख्या ग्रामीण भागात पुस्तक प्रदर्शन असूनही ५० लाख रूपये किंमतीच्या पुस्तकांची विक्री झाली. अमृतनगरीतील आनंद हाच गडाख साहेबांचा अमृतमहोत्सवी सन्मान होय. 

यावेळी गीतकार संजय गिते यांनी शंभर विद्यार्थिनींनी कोरस दिलेले ‘सोनईच्या गावकुसाला सूर्य उगवला जी…’ हे गीत पहाडी आवाजात गाऊन या सोहळ्याला अनोखी भेटच दिली. प्रा. सुप्रिया सहस्त्रबुध्दे (पुणे) यांनी इंग्रजीत अनुवाद केलेल्या 'अर्धविराम'चे प्रकाशन मोठ्या थाटात करण्यात आले. कार्यक्रमाचे मार्मिक सूत्रसंचालन डाॅ. सुभाष देवढे यांनी केले. कार्यक्रमास साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, सहकार, धार्मिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.