Breaking News

कोम्बिंग ऑपरेशन न थांबविल्यास पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्याचा इशारा

नवी मुंबई - भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधाथर्थ पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवर नवी मुंबई पोलिसांकडून गंभीर गुन्हे दाखल करून या कार्यकर्त्यांना अटक करण्याकरिता कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. ते थांबवावे अन्यथा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा आरपीआयचे कोकण प्रांताचे प्रमुख सिद्राम ओहळ यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी रिपब्लीकन सेनेचे नवी मुंबई प्रमुख ख्वाजामियाँ पटेल, भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अरूण गायकवाड, आरपीआयचे नवी मुंबई युवक अध्यक्ष विजय कांबळे आदी आंबेडकरी चळवळीच्या गटांचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र बंददरम्यान, नवी मुंबईकरांना कोणत्याही पद्धतीने त्रास होऊ नये म्हणून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून प्रयत्न करण्यात आले. विभाग स्तरांवर कार्यकर्त्यांच्या बैठका घेवून शांततेत बंद पाडण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले होते. 


3 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदात नवी मुंबईकरांनी तसेच येथील व्यापारी व उद्योजकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेवून बंद यशस्वी केला. मात्र काही जातीयवादी विचाराच्या कार्यकर्त्यांनी याचा फायदा घेवून पोलीस अधिका-यांना धमक्या देणे, दगडफेक करणे, गाड्या फोडणे, एपीएमसीतील व्यापा-यांना दमदाटी करणे असे प्रकार केले होते. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते शांततेत बंद यशस्वी करत असताना समाजकंटकांकडून झालेल्या घटना दुदैवी आहेत. त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे. परंतु बंद काळात शांततेचे आवाहन करणा-या 175 आंबेडकरी कार्यकर्त्यांवर दंगली सारखे गंभीर गुन्हे दाखल करून त्यांची धरपकड नवी मुंबई पोलिसांनी सुरू केली आहे. ती दुदैवी बाब असून या घटनेचा आम्ही निषेध करतो व पोलिसांनी दंगलीचे दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेवून पोलिसांनी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांविरोधात सुरू केलेले कोम्बींग ऑपरेशन तत्क ाळ थांबवावे. अशी मागणी आरपीआयचे कोकण प्रांताचे प्रमुख सिद्राम ओहळ यांनी पत्रकार परिषदेत केली .