Breaking News

काटेरी झुडपांचे पसरले साम्राज्य


कुळधरण/प्रतिनिधी/- कुळधरण- कर्जत या मुख्य रस्त्यालगत असलेल्या तालुक्यातील सर्वाधिक पाणीधारण क्षमतेच्या दुरगाव तलावाची पिंचिंग ही उचकटलेली असुन तलावाच्या भरावावर मोठमोठी झाडे वाढल्याने भरावालाच धोका निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
दुष्काळात तालुक्याची तहान भागवणारा तलाव अशी या तलावाची ओळख आहे. टंचाई काळात कुकडी धरणाचे पाणी सोडुन या तलावातुन कर्जत,जामखेडसह इतर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा होतो. मात्र सध्या तलावाच्या दुरावस्थेमुळे तलावाला धोका निर्माण झाला असुन सिंचन विभागाचे दुर्लक्ष आहे.

तालुक्याला संजीवनी ठरलेला असतानाही तलावाच्या देखभालीकडे माञ अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्याची भविष्यात मोठी किंमत कर्जत तालुक्याला मोजावी लागेल अशी शक्यता दिसत आहे. दुरगाव तलावाच्या आतील बाजुची दगडांनी बनविलेली पिचिंग उचकटुन गेली आहे. दगड घसरुन तलावाच्या पाण्यात पडले आहेत. तर काही दगडाचे जागोजागी ढीग बनले आहेत. त्यामुळे भरावाची माती उघडी पडली असुन पाण्याच्या लाटा त्यावर आदळुन भराव जीर्ण होत आहे. भरावावर झाडेझुडपे वाढली असुन त्यांच्या मुळ्यांनी दगड उचकटले जात आहेत. भराव पोखरला जात असुन भुसभुशीत होऊन फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. तलावाखालील भागातील दुरगाव,थोटेवाडी या गावांसह हजारो एकर क्षेञाला त्याचा पाण्यापासून धोका पोहचु शकतो. तलावाच्या भरावावरुन सर्रासपणे वाहने नेली जात असल्याने भरावावर खड्डे पडले आहेत.

अनेक वर्षापासुन भरावावरील झाडे, झुडपे हटविण्यात आली नाहीत. सिंचन विभागाच्या दुर्लक्षामुळे भविष्यात मोठी वित्त तसेच मनुष्यहानी होवु शकते. हा तलाव पाटबंधारे विभागाकडून कृष्णा खोरे महामंडळाकडे हस्तांतरित झाला आहे. या विभागाचे शाखा कार्यालय कुळधरण येथे असुन उपविभाग राशीनला आहे. कार्यकारी अभियंता कार्यालय श्रीगोंदा येथे आहे. या कार्यालयातील यंत्रणेकडुन या तलावाच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने भिती निर्माण झालेली आहे. शाखा अभियंता अनारसे, उपअभियंता साठे व कार्यकारी अभियंता कोळी यावर काय कार्यवाही करतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.