नगरपरिषदेच्या शाळा संगणकीकृत करण्याचा मानस, नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांचा संकल्प
त्या म्हणाल्या, की श्रीरामपूर शहराला गतवैभव मिळवून देण्यासाठी खूप काही करावे लागणार आहे. यासाठी सत्तेची ही चार वर्षे तशी कमीच पडणार आहेत. मात्र या अत्यंत कमी कालावधीत या शहरात भुयारी गटार योजना, भाजी मंडईत होणारी गर्दी लक्षात घेऊन ‘सॅटेलाईट’ भाजी मंडई ही संकल्पना राबविण्याचा संकल्प आम्ही केला आहे. यातून शहराच्या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण अशा चारही बाजूंना भाजीमंडई करण्यात येणार आहे. यामुळे सध्याच्या भाजीमंडई आणि आठवडे बाजारात होणारी गर्दी कमी होईल. सर्वात महत्वाचे म्हणजे या ‘सॅटेलाईट भाजी मंडई ’मुळे महिलांना भाजी खरेदीची आनंद घेता येईल.
शहरातील गर्दी, वाहतूक कोंडी आणि अस्ताव्यस्त वाहन पार्किंग या आणि अन्य समस्यांवर पोलीस यंत्रणा तसेच वाहतूक पोलीस यंत्रणेशी चर्चा करून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यात महत्वाचा प्रश्न म्हणजे नगर परिषदेच्या शाळांच्या शैक्षणिक दर्जाविषयी निर्णय घेणे. याचे कारण उद्याचे नागरिक या शाळांमधून घडत असल्याने या शाळा संगणकीकृत करण्यावर भर देण्यात येणार आहे. एक एक शाळा घेऊन या शाळांच्या एका खोलीत संपूर्ण संगणकीकृत शिक्षण देण्यात येईल. यापुढे संगणकीकरणाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे मुलांना संगणकाचे मूलभूत ज्ञान देण्यावर भर देण्यात येईल.