Breaking News

शेतकर्‍यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याशिवाय सरकारला जाग येत नाही - विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची राज्य सरकारवर टीका

मुंबई : राज्यातील शेतकर्‍यांना मंत्रालयात येऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याशिवाय सरकारला जाग येत नाही, हे मागील अनेक घटनांमधून स्पष्ट झाले आहे. मेक इन महाराष्ट्र आणि मॅग्नेटिक महाराष्ट्राचे धोरण मूठभर धनदांडग्यांच्या गल्ला भरणारे आणि शेतकर्यांना आत्महत्येसाठी चिथावणी देणारे धोरण आहे. हे सरकार शिवाजी महाराजांचे नाव घेऊन शेतकर्यांची फसवणूक करत असल्याची टीका विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरूवारी केली. 

राधाकृष्ण विखे पाटील गुरूवारी सकाळी 11 वाजता जेजे रूग्णालयात धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली. यावेळी वैद्यकीय अधिकार्‍यांसह धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील देखील उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे देताना विखे पाटील म्हणाले की, धुळे जिल्ह्यातील एका मंत्र्याला तो मंत्री असल्याने तात्काळ जमिनीची खातेफोड करून मिळते, पण धर्मा पाटील सारख्या कोणताही वशिला अन राजाश्रय नसलेल्या शेतकर्‍यांना मंत्रालयात येऊन विष घ्यावे लागते, ही परिस्थिती या सरकारने राज्यात निर्माण केली आहे. धर्मा पाटील यांना सरकारने अत्यल्प मोबदला देण्यासंदर्भात विखे पाटील पुढे म्हणाले की, हे सरकार शेतकर्‍यांची कमी पैशात बोळवण करण्याचा प्रयत्न करते आहे. सरकारी दलालांमार्फत येणार्‍या शेतकर्‍यांना योग्य किंमत मिळते. पण दलालाच्या तुंबड्या न भरणार्‍या शेतकर्‍यांवर जीव देण्याची वेळ येते, यातून हे सरकार नेमका काय संदेश देते आहे ? आता धर्मा पाटलांनी विष घेतल्यावर सरकार अनुदान देण्याच्या घोषणा करते. मग हे शहाणपण आधीच का नाही सुचले ? शेतकर्‍यांना सरकारी अनुदानाची भीक नको, आपल्या जमिनीची योग्य किंमत हवी आहे. धर्मा पाटील सारख्या सर्वसामान्य शेतकर्‍यांला न्याय का नाकारला गेला, याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही विखे पाटील यांनी यावेळी केली.

सरकारकडून विरोधकांवर पाळत : विखे
सरकार विरोधकांवर पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटलांच्या पत्रकार परिषदेत स्पेशल ब्राँचच्या दोन पोलिस अधिकार्‍यांनी छुप्या रितीने हजेरी लावल्याने एकच खळबळ उडाली आहे. सहायय्क पोलीस निरीक्षक सुभाष सामंत आणि हवालदार बाजीराव सरगर यांनी साध्या गणवेशात पत्रकार परिषदेत हजेरी लावल्याचं उघड झाल्याने आता याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. याप्रकरणी विखे-पाटलांनी तात्काळ मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्याशी फोनवरुन संपर्क साधून या संपूर्ण प्रकाराबाबत विचारणा केली. त्यावेळी आपण अशी कोणतीही परवानगी पोलिसांना दिली नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केलं.