Breaking News

माझा पक्ष मलाच बाहेर ढकलतोय भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची खंत

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातील खंत जाहीर बोलवून दाखवत, माझा पक्ष मलाच बाहेर ढकलतोय, मी पक्ष सोडावा, अशी परिस्थिती पक्षाकडूनच निर्माण केली जात असल्याची खंत गुरूवारी व्यक्त केली. खडसे जळगाव जिल्ह्यातल्या रावेर जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी देखील उपस्थित होते. खडसेंनी त्यांची अगतिकता व्यक्त करताच पक्ष तुम्हाला ढकलून देईल याची वाट पाहू नका. मित्र म्हणून मी तुम्हाला मदत करेन. आमच्यात तुमचे स्वागत आहे, असे म्हणत खडसे यांना काँग्रेस प्रवेशाची अप्रत्यक्ष ऑफरच दिली. 


आजच्या राजकारणात खडसे खरे स्वाभिमानी आहेत, अशी पुस्तीही चव्हाणांनी जोडली. या अगोदर राष्ट्रवादीकडून अजित पवारांनीही खडसेंना ऑफर दिली होती. खडसे भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थ असताना विरोधकांमध्ये एकनाथ यांना मात्र मोठा भाव असल्याचे दिसते. राजकारणात काहीही होऊ शकते, मी 40 वर्षापासून पक्षाशी एकनिष्ठ आहे. पण पक्षानेच जर दूर केले, तर माझ्यासमोर पर्याय उरणार नाही. गेल्या 20 महिन्यात मी एकदाही मला मंत्री करा असे पक्षाला म्हटलेले नाही. गेल्या 40 वर्षात एकदाही पक्ष बदल करण्याचा विचार केला नाही. मी कोणता गुन्हा केला ते सरकारने जाहीर करावे आणि चूक केली असेल तर शिक्षा द्यावी असे खडसे म्हणाले.

तुमच्यासाठी दरवाजे खुले : अशोक चव्हाणकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांना जाहीर ऑफर दिली. खडसे राज्यातील खरा स्वाभिमानी नेता आहे. सत्ता गेली तरी स्वाभिमान जपणारा नेता म्हणजे खडसे. पक्षातून ढकलण्याची वाट पाहू नका. नाथाभाऊ काहीही असो, ‘दोस्त को याद करो’, कोणताही निर्णय घ्या, तुमच्यासाठी सर्व दरवाजे उघडे आहेत, असे अशोक चव्हाण म्हणाले.