Breaking News

विज्ञान म्हणजे मानवाला लाभलेला एक परिस ः झावरे


विज्ञानाचा अभ्यास विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण रूजवू शकतो. हाच वैज्ञानिक दृष्टिकोण आणि विचार ज्ञानप्राप्तीची विश्‍वसनीय पद्धत आहे. विज्ञान हे एक असे अस्त्र आहे की, त्याच्या शास्त्रशुध्द व विधायक वापरामुळे दारिद्रय, भूक, अज्ञानता, अंधश्रद्धा आणि भय यासारख्या विविध समस्यांवर उपाय शोधून समाधान मिळवता येऊ शकते. असे मत न्यू आर्टस् महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे यांनी मांडले. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे जनता कला व विज्ञान महाविद्यालय, रूईछत्तिसी येथील विद्यार्थी विकास मंडळांतर्गत नुकतेच विशेष मार्गदर्शन व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उद्घाटक व व्याख्याते म्हणून विज्ञान आणि आजचा समाज या विषयावर प्राचार्य डॉ. झावरे बोलत होते. अज्ञानापासून मुक्त होऊन मानवी जीवनाच्या साफल्यासाठी उपयोगी ठरेल अशी तंत्रविद्या निर्माण करते हे विज्ञानाचे कार्य आहे. सृष्टिचे रहस्य जाणणे हे विज्ञानाचे ध्येय आहे. विज्ञानाने मानवी जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणले आहेत. यामुळेच मानवी जीवनाला स्थैर्य मिळाले आहे. अंधश्रद्धेपासून अलिप्त असा नवा समाज खर्‍या अर्थाने निर्माण करायचा असेल तर विज्ञानाची सोबत घेणे गरजेचे आहे. असे मत जनता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश बाबर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मांडले. यावेळी उपप्राचार्य डॉ. डी. एस तळुले, महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद यांचीही उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा. रमेश शितोळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रविण नागवडे यांनी केले. कार्यक्रमाचे अहवाललेखन महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख प्रा. अनिता भद्रे यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. पोपट सुंबरे यांनी मानले. यावेळी प्रा. रविराज सुपेकर, प्रा. सुवर्णा शेळके, प्रा. अनंत चव्हाण आदींनी सहकार्य केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.