Breaking News

कारखाना चालविण्यासाठी मोठे निर्णय घ्यावे लागणार : विखे


राहुरी प्रतिनिधी : - शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सहकार जीवंत राहिला पाहिजे. सध्या साखरेचे दर ढासळत असल्याने राज्यातील साखर उद्योगापुढे भीषण संकट उभे राहिले आहे. ऊसाला कसा भाव द्यायचा, हा मोठा प्रश्न आहे. सरकारने याबाबतीत भूमिका घेणे महत्वाचे आहे. तालुक्याची कामधेनु असलेला डॉ. तनपुरे कारखाना सुरू करण्यासाठी अनंत अडचणी आल्या. त्याकामी जिल्हा बँकेची भरीव मदत झाल्याने या अडचणींवर मात करता आली. पुढील काळात कारखाना सक्षमपणे चालविण्यासाठी मोठे निर्णय घ्यावे लागणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केले. 
राहुरी खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामसचिवालयाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्री घुले होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, आ. शिवाजी कर्डिले, शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, जि. प. सदस्य शिवाजी गाडे, नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते शिवाजी सोनवणे, रावसाहेब तनपुरे, सभापती मनिषा ओहोळ, कारखान्याचे अध्यक्ष उदय पाटील, उपाध्यक्ष शाहूराव निमसे आदी उपस्थित होते. प्रारंभी कारखान्याचे संचालक नंदकुमार डोळस यांनी प्रास्ताविक केले. 

विखे म्हणाले, सरपंचाची निवड थेट जनतेतून होते आहे. पंचायत राज घटनेत बदल दुरूस्ती करून ग्रामसभेला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. संगणकीकरणाने जग जवळ येत आहे. शासनदरबारी न्यायासाठी प्रकरणे कित्येक दिवस पडून असायची. ती आमच्या मागील सरकारच्या काळापासून तात्काळ निकाली काढण्यासाठी प्रयत्न झाले. सेतु कार्यालयातून जशी सर्व कामे होतात, तसाच प्रयत्न ग्रामसचिवालयातून होण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. आ. कर्डिले म्हणाले, की जिल्हा बँकेच्या माध्यमातून महिला बचत गटांना मुद्रा योजनेद्वारा कर्ज उपलब्ध करून देणार आहोत. राहुरी विद्यापीठ तसेच भागडाचारीचा प्रश्न आगामी काळात सोडविण्यात येईल.

यावेळी तानाजी धसाळ, शब्बीर देशमुख, नामदेव ढोकणे, सरेश करपे, जयश्री डोळस, निर्मला मालपाणी, उपसभापती रविंद्र आढाव, अण्णा बाचकर, पंचायत समिती सदस्य प्रदिप पवार, ज्ञानदेव तोडमल, निसार सय्यद, बाबासाहेब शेंडगे, ईमाम शेख, निसार शेख, अमोल आळपे, संदीप तोडमल, भाऊ शेंडगे, पंढरीनाथ शेटे, सुरेखा शेटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच सचिन शेटे व उपसरपंच बाबासाहेब शेंडगे यांनी आभार मानले.