Breaking News

कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती शेतक-यांना होणे अपेक्षित - सदाभाऊ खोत

सांगली, दि. 20, जानेवारी - प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी व अन्य शेतक-यांच्या विचारांची देवाण- घेवाण होणे आवश्यक आहे. देशभरात व जगभरात कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतक-यांना होणे अपेक्षित आहे. यात कृषी प्रक्रिया व अन्न प्रक्रिया उद्योग, जोडधंदे, कुक्कुटपालन, शेळीपालन व कृषी मालाची आयात- निर्यात आदीबाबत अद्ययावत माहिती होण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करावे. त्यामुळे स्थानिक शेतक-यांच्या मुलांना व युवकांना नवनवे उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन व प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले आहे. 

इस्लामपूर येथे फेब्रुवारीमध्ये होणारा जिल्हा कृषी महोत्सव कृषी विभागाने संयोजन समितीच्या सर्व सदस्यांशी समन्वय ठेवून यशस्वी करावा, अशी सूचनाही सदाभाऊ खोत यांनी दिल्या आहेत. इस्लामपूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित कृषी महोत्सव नियोजन आढावा बैठकीत सदाभाऊ खोत बोलत होते. जागतिक पातळीवरील स्पर्धेच्या युगात स्थानिक शेतकरी आपले स्थान निर्माण करू शकतील. त्यासाठी ‘आत्मा’ अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या कंपन्यांनाही या महोत्सवात सहभागी करून घ्यावे. नियामक मंडळाच्या समितीचे अध्यक्ष व सदस्यांनी पार पाडावयाच्या जबाबदारीचे नियोजन करावे. या महोत्सवात जवळपास 200 स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. यात कृषी संलग्न स्टॉल्सबरोबर आरोग्य विभागाचाही स्टॉल उभा करावा. या महोत्सवासाठी होणारी गर्दी लक्षात घेता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही. आपत्कालीन यंत्रणा आदीबाबत सतर्क रहावे, अशी सूचनाही खोत यांनी केली.