Breaking News

अखंड नामचिंतन सोहळ्याची काल्याची दहीहंडी फोडून सांगता


नेवासाफाटा/प्रतिनिधी/-येथील जयहरी अध्यात्मिक प्रतिष्ठानच्या जयहरी आश्रमामध्ये सद्गुरू ब्रम्हलीन श्रीपाद बाबांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित अखंड नामचिंतन सोहळ्याची आश्रमाचे प्रमुख गुरुवर्य ह.भ.प .कडूभाऊ काटे महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने दहीहंडी फोडून उत्साहात सांगता करण्यात आली.
जीवन नौका पैलतीर जाण्यासाठी भंगवंताचे नामचिंतन हाच मार्ग असल्याचे प्रतिपादन यावेळी बोलतांना हभप कडूभाऊ काटे महाराज यांनी केले. आठ दिवस चाललेल्या नामचिंतन सोहळ्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण,प्रवचन,कीर्तन आदी कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या सप्ताहमध्ये हजारो भाविकांनी सहभाग नोंदविला.या सोहळ्यामध्ये योगदान देणाऱ्या भाविकांचा हभप कडूभाऊ काटे महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

उपस्थित मान्यवर व भक्तगणांचे डॉ.अमरनाथ काटे यांनी स्वागत केले.यावेळी झालेल्या काल्याच्या कीर्तनात बोलतांना गुरुवर्य हभप कडुभाऊ काटे महाराज म्हणाले की संत हे भूतलावर जीव ब्रम्ह ऐक्याचा काला करतात. तसेच मुक्तहस्त नामदान करून मनुष्य जीवाचा उध्दार करतात. नामचिंतनात देहभान हरपणे म्हणजेच गोपिकांची स्थितीची प्राप्ती होणे आहे. असे सांगून त्यांनी भगवान परमात्म्याच्या लीलांचे वर्णन आपल्या काल्याच्या किर्तनातून केले.

यावेळी रामकृष्ण महाराज कराळे,औरंगाबाद येथील मेजर घुगे,अनिल पुंड,मेजर गाडेकर,हभप साखरे ताई,नांगरे भाऊ,आत्माराम महाराज धाडगे, वशिष्ठ तरटे गुरुजी यांचेसह हजारो भाविक उपस्थित होते यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.