Breaking News

देशाची बदलती हवा काँग्रेसला अनुकूल समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता आ. बाळासाहेब थोरात यांचे मत

संगमनेर प्रतिनिधी  ;- गेल्या साडेतीन - चार वर्षांपूर्वी देशात निर्माण झालेले राजकीय वातावरण वेगाने बदलत आहे. गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत याचे प्रत्यंतर आले आहे. ही बदललेली राजकीय हवा काँग्रेससाठी अनुकूल आहे. गुजरातमधील निवडणुकीत आपण स्वत : या बदललेल्या परिस्थितीचा जवळून अनुभव घेतला आहे. सर्व साधन सामग्री असतानाही तिथे भाजपची पुरती दमछाक झाली. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोठे यश मिळवले. या निवडणुकीमुळे राहुल गांधी हे पक्ष तसेच देश चालवण्यास समर्थ असल्याचे सिध्द झाले आहे. केंद्र आणि राज्यातील विद्यमान सरकारकडून सर्वसामान्य जनतेचा मोठा अपेक्षाभंग झाला आहे. जनतेत विद्यमान सरकारच्या कामगिरीबाबत मोठा असंतोष आहे. त्याला वाट करुन देतानाच जनतेला योग्य सरकार मिळेल, याची दक्षता घेणे ही काँग्रेसची जबाबदारी बनली आहे. आगामी निवडणुकांच्या प्रार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेस तसेच अन्य समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मत राज्याचे माजी महसूलमंत्री, आ. बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.


थोरात गुजरात निवडणुकीपासून काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्तुळात चर्चेत आहेत.काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांना गुजरातमध्ये उमेदवारी निश्‍चितीसाठी असलेल्या छाननी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती.थोरात यांनी ती यशस्वीपणे पेलत सक्षम उमेदवार निवडण्याच्या कामात योगदान दिले.या पार्श्‍वभूमीवर देश तसेच रायातील सध्याची राजकीय स्थिती,काँग्रेसपुढील आव्हाने आदी विषयांवर आ.थोरता यांनी दिलखुलास संवाद साधला.

गुजरात निवडणुकीच्या अनुभवाबाबत सांगतांना ते म्हणाले, की आजपर्यंतच्या राजकीय वाटचालीत आपण महाराष्ट्रातच काम केले आहे. परंतु गुजरात निवडणुकीच्यावेळी काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्ष सोनिया गांधी व आताचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्यावर विश्‍वास दाखविला. गुजरातमध्ये उमेदवार निश्‍चितीच्या छाननी समितीचे अध्यक्षपद सोपविले. या समितीत पक्षाचे गुजरातचे प्रभारी व राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोळंकी व अन्य नेते होते. गुजरातमध्ये सक्षम व योग्य उमेदवार निवडीपासून मोठे आव्हान होते. त्यासाठी गुजरातचा विभागनिहाय अभ्यास करुन आढावा घेतला. स्थानिक तसेच राष्ट्रीय नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 

मधल्या काळात राहुल गांधी यांच्या दौर्‍यांना मिळणारा प्रतिसाद काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविणारा होता. त्यामुळे उमेदवारीसाठीही मोठी स्पर्धा निर्माण झाली. तब्बल दोन महिने सातत्याने काम करीत उमेदवार निवडून सविस्तर यादी पक्षांच्या केंद्रीय निवडणूक समितीकडे सादर केली. उमेदवार निश्‍चित करतांना नाराजांची समजूत काढणे, बंडखोरांना थोपविणे अशी कामे संवाद साधून केली. त्यामुळेच स्व:त पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या उमेदवार निवडीचे काम चांगले झाल्याचे जाहीरपणे दिले. या प्रशंसेमुळे गुजरामध्ये घेतलेल्या मेहनतीचे चीज झाल्याचे समाधान लाभले. गुजरात व हिमाचल प्रदेशच्या निकालानंतर हिमाचलप्रदेशामध्ये विधिमंडळ गटनेता निवडीसाठीही निरीक्षक म्हणून आपल्यावर जबाबदारी सोपविली गेली. माजी केंद्रीयमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यासह हिमाचल प्रदेशचा दौरा करुन समन्वयाने नेता निवड केली. पक्षश्रेष्ठींनी दिलेले काम पूर्ण क्षमतेने यशस्वीपणे करता आल्याचे समाधान वाटते. राष्ट्रीय पातळीवर काम करण्याचा हा अनुभव अतिशय संस्मरणीय आहे.

देशातील आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करतांना आ. थोरात म्हणाले, की मोठी आश्‍वासने देऊन व स्वप्ने दाखवत सत्तेवर आलेल्या केंद्रातील सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे. सर्वच क्षेत्रात सरकारचे अपयश दिसून येत आहे. केंद्रातील सरकारने सत्तेवर आल्यावर नोटबंदीचा निर्णय घेतला. आज दीड वर्षांनंतर नोटाबंदीचे अपयश दिसून येत असताना सत्ताधारी त्यावर मौन बाळगून आहेत. नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर आल्याचे दिसत नाही. मग नोटाबंदीचे फलित काय, असा प्रश्‍न उपस्थित होतो. या काळात देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आली. रोजगार निर्मिती जवळपास बंद झाली. निवडणूकीच्या वेळी दोन कोटी रोजगार देण्याच्या घोषणा करण्यात आल्या. आज नेमकी उलट परिस्थिती असून नोटाबंदीमूळे अनेकांचे होते ते रोजगार गेले. नोटाबंदीप्रमाणेच जीएसटीच्या अंमलबजावणीतही सरकारला अपयश आले. वास्तविक माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या काळात जीएसटीचे योग्य प्रारुप तयार करण्यात आले होते. त्यात बदल करुन आत्ताच्या सरकारने जीएसटी लागू केला. सर्वसामान्य जनता व्यापार्‍यांच्या दृष्टीने हा जिझिया कर झाला आहे. व्यवसाय, व्यापारावर याचा विपरित परिणाम झाला आहे. आगामी निवडणुकांत महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादीसह अन्य समविचारी पक्षांनी एकत्र आले पाहिजे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचा देशातील प्रभाव वाढला आहे. त्यांची ध्येयधोरणे व विचार जनतेला आकर्षित करीत आहेत. विशेषत युवा मतदारांचा काँग्रेसकडील ओढा वाढत चालला आहे.

महाराष्ट्रातील राजकीय चित्र बदलेलगुजरात निवडणुकीत काँग्रेसला अगदी थोड्या फरकाने पराभव पत्करावा लागला. तरी या निकालाने भाजपाला मोठा धक्का बसलेला आहे. देशातील वातावरण बदलल्याचा अंदाज यातून येत आहे. अशावेळी काँग्रेससह समविचारी पक्षांनी एकत्र येऊन भाजपशी टक्कर देण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला चांगली संधी आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. त्यामुळे राज्यात राज्यात राष्ट्रवादीसह अन्य समविचारी पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने योग्य प्रयत्न झाल्यास महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बदलेल.

जलयुक्त शिवारमध्ये त्रुटीशास्त्रीयदृष्ट्या जलसंधारणाची कामे करतांना माथा ते पायथा अशी कामे करणे अपेक्षित असते. मृदसंधारण व नंतर जलसंधारण अशी योग्य पध्दत आहे. सध्याच्या सरकारने जलयुक्त शिवार योजना राबवितांना माथ्यावर परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवून खाली जमीन खोदून ठेवण्याचे काम चालविले आहे. या अशास्त्रीय कामांमुळे भविष्यात माती वाहून जाऊन समतोल बिघडू शकतो. यंदा चांगला पाऊस झाल्याने बंधार्‍यांमध्ये पाणी जमा झाले आहे. त्याचे आकडे सादर करुन सरकार स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. परंतू या गोष्टी अतिशय तात्पुरत्या आहेत. त्याचे दुष्परिणाम आगामी काळात पाहायला मिळतील.

सोशल मिडीया चे बुमरँग२०१४ च्या निवडणुकीपासून भाजपने सोशल मिडियावर आक्रमक प्रचार केला. मात्र या प्रचारातील फोलपणा आता साडेतीन वर्षांनंतर जनतेसमोर येत आहे. गुजरात निवडणुकीच्यावेळी तर याच सोशल वरुन भाजपला लक्ष्य करण्यात आले. यात तरुण वर्ग आघाडीवर होता. सोशल मिडियातील नकारात्मक प्रतिक्रियांमुळे भाजपच्या पायाखालीची वाळू सरकली आहे. त्यामुळेच मधल्या काळात सोशल मिडियावर विरोधात पोस्ट टाकणार्‍यांवर कारवाईची भाषा भाजप सरकारने सुरु केली. सोशल मिडियावर निर्बंध लावण्यास प्रारंभ केला. आज सोशल मिडियावर पाहिले तर सरकार विरोधात जनमत तयार होत असल्याचे वातावरण आहे. त्यामुळे सोशलमिडियाचे अस्त्र भाजपवरच ‘बुमरँग’सारखे उलटले आहे.