Breaking News

आजचे विद्यार्थी उद्याचा देश घडवतील : कोकाटे


नगर ता. प्रतिनिधी ;- विद्यार्थ्यांकडून राबविले जाणारे राष्टीय सेवा योजनेचे काम आदर्शवत आहे. यातून गावकर्यांना प्रेरणा मिळत असते. ग्रामीण भागातील जनता ज्याप्रमाणे या विद्यार्थ्यांना नेहमी सहकार्य करते, त्यामुळे विद्यार्थ्यांना देशाप्रती आपुलकी निर्माण होते. पुढे जाऊन हेच विद्यार्थी उद्याचा देश घडवतील, असे प्रतिपादन पंचायत समितीचे उपसभापती प्रविण कोकाटे यांनी केले. 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व विश्वभारती अकॅडमीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेचा शिबिर कार्यक्रम दि. २ ते ८ जानेवारीदरम्यान नगर तालुक्यातील सोनेवाडी येथे यशस्वीरित्या पार पडला. या कार्यक्रमामध्ये कोकाटे बोलत होते. 

यावेळी राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रा. शिवाजी जोशी, डॉ. जे . सी. बुरसे, सोनेवाडीच्या सरपंच मोनिका चांदणे, सुरेश चांदणे, वैभव बेरड, विठ्ठल बेरड, प्रा. कुलट आदीं उपस्थिती होती. या शिबिरांतर्गत सोनेवाडी गावात सामाजिक प्रबोधन फेरी काढण्यात आली. गावातील स्वच्छता सर्वेक्षण, रस्ते पुनर्बांधणी, गावातील व संजीवनी गड स्वच्छता, गावातील जलस्तर उंचावण्यासाठी चर खोदून बांध बंधने, गावातील रस्त्यांची डागडुजी आदी कामे करण्यात आली. शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना व गावकर्यांना तज्ञांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. शरद बोरुडे यांनी माहिती अधिकार कायदा, डॉ. अभय शाळीग्राम यांनी युवा शक्ती विकास, डॉ. वृषाली रानमाऴकर यांनी कॅन्सर उपचार व प्रतिबंध, प्रा. कनौजिया के. के यांनी राष्टीय एकात्मता, प्रा. सागर गडकर यांनी व्यक्तिमत्व विकास व नेतृत्व शैली, मठाधीपती महंत शंकरभारती महाराज यांनी अध्यात्म आणि आरोग्य अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. 

शिबिराच्या समारोपप्रसंगी जि. प. सदस्य शरद झोडगे, उपसभापती प्रविण कोकाटे, संदीप गुंड, वैभव बेरड, सुनिता बेरड, बाबासाहेब बेरड, विठ्ठल बेरड, केशव बेरड, ग्रामविकास अधिकारी भाग्यश्री देवतळे, सुनील कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.