Breaking News

आंगणेवाडीत भव्य जिल्हा महोत्सवाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. 25, जानेवारी - आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीमातेच्या जत्रोत्सवानिमित्त 27 व 28 जानेवारी 2018 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग ओरोस व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सिंधुदुर्ग यांचे संयुक्त विद्यमाने जत्रा परिसरात भव्य जिल्हा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या भव्य जिल्हा महोत्सवात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यातर्फे राबविण्यात येणार्‍या विविध योजना, म्हणजे गरीब, महिला, मुले, मागासवर्गीय यांच्यासाठी मोफत वकिल सहाय्य योजना, लोक अदालतीच्या माध्यमातून प्रलंबीत व वादपूर्व प्रकरणांचा निपटारा जलदपणे करणेसाठी न्यायाधीश व विधिज्ञ व समाज कार्यकर्ते यांचे पॅनेल, मध्यस्थी प्रक्रिया व तिचे फायदे, तसेच मध्यस्थीच्या माध्यमातून जुने वाद व तंटे सामंजस्याने मिटविण्याचा प्रयत्न करणेसाठी प्रशिक्षित न्यायाधीश, विधिज्ञ व समाज कार्यकर्ते यांचे पॅनेल, विविध विषयांवरील कायदे विषयक जागृती शिबीरे आयोजित करुन जनमानसात कायदेविषयक जागृती निर्माण करणेसाठी प्रयत्न करणे अशा विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे.


कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सिंधुदुर्ग यांच्या तर्फे कोकण मेवा दालन, शेतीमध्ये प्लॅस्टीकचा वापर, थेट पणन विषयी मार्गदर्शन, शेतकरी अभियानाचे जिल्ह्यातील योगदान व यशस्विता, नियंत्रित शेतीचे व्यवस्थापन, शेतमालाचे क्लिनींग, ग्रेडिंग, पॅकेजिंग व ब्रँडिंग, शेतमाल अधारित प्रक्रिया उद्योग व निर्यात, शित साखळी विषयी माहिती, लघु उद्योजकांना मार्गदर्शन इत्यादी विषयांवर माहिती दिली जाणार आहे. तसेच जिल्हास्तरीय कृषी मालाचे प्रदर्शन व विक्री असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.