Breaking News

सांगली मध्यवर्ती बसस्थानक नूतनीकरणासाठी 1 कोटी 38 लाखाचा प्रस्ताव मंजूर

सांगली, दि. 25, जानेवारी - माधवनगर येथील दहा एकर जागेत नवीन बसस्थानक व्हावे व सांगली शहरातील मुख्य मध्यवर्ती बसस्थानकाचे नूतनीकरण व्हावे, या मागणीसाठी पाठपुरावा करणा-या शिवसेनेचे युवा नेते सांगली महापालिकेचे नगरसेवक शेखर माने यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्य मध्यवर्ती बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी तातडीने 1 कोटी 38 लाख रूपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

सांगली- माधवनगर रस्त्यावर वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यानजीक महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची हक्काची दहा एकर जागा वर्षानुवर्षे वापराविना पडून असल्याचे सांगून शेखर माने म्हणाले, की या जागेवर नवीन बसस्थानक व्हावे, यासाठी आपण पहिल्यापासूनच पाठपुरावा करीत होतो. या कामासाठी निविदाही प्रसिध्द करण्यात आली होती. त्यासाठी दिवाकर रावते यांना वारंवार निवेदने देतानाच नुकतीच प्रत्यक्षात त्यांची भेट घेऊन ही मागणीही केली होती.