जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत गत तीन वर्षांत राज्यात जलसंधारणाची भरीव कामे - प्रा. राम शिंदे
सांगली - राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी टंचाईमुक्त महाराष्ट्र सर्वांसाठी पाणी 2019 जलयुक्त शिवार योजने अंतर्गत गत तीन वर्षांत राज्यात जलसंधारणाची भरीव कामे झाली. त्यातून भूजलपातळी वाढली असून त्याचा शेतक-यांना फायदा होऊन उत्पन्नात वाढ झाली. अर्थार्जन वाढल्यामुळे जीवनस्तर वाढला आहे. जलयुक्त शिवार अ भियानातून राज्याची टंचाई मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी शुक्रवारी केले.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे ’पाणी अडवा, पाणी जिरवा‘ हे धोरण होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियान राबिवण्याचा निर्णय घेतला. विविध सात खात्यांच्या जवळपास 14 योजना एकत्रित करून पाण्याचा थेंब अन थेंब अडविला गेला पाहिजे, या दृष्टीने नियोजन केले असल्याचे प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.
या महत्त्वाकांक्षी अभियानाच्या माध्यमातून गत तीन वर्षांत चार लाख 25 हजार कामे पूर्ण झाली आहेत. त्यातून 11 हजार गावे जलपिरपूर्ण झाली. त्यासाठी राज्य शासनाने जवळपास सात हजार कोटी रुपयांच्या विशेष निधीची तरतूद केली. विविध देवस्थान, सीएसआर व लोकसहभागातूनही या अभियानाला मोठा निधी प्राप्त झाला आहे. या अ भियानामुळे टँकरची संख्या आता सात हजारवरून दीड हजारावर आली. सन 2019 पर्यंत उर्वरित महाराष्ट्र कायमचा दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न आहे.
जलयुक्त शिवार अभियानातून संपूर्ण राज्यात भूजलपातळी जवळपास दीड ते दोन मीटरने वाढली. नवीन कामांबरोबरच जुन्या कामांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. याशिवाय राज्य शासनाने राबविलेल्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या अभियानाचाही चांगला फायदा झाला आहे. पर्जन्यमानाचे विकेंद्रित पाण्याचे साठे निर्माण झाले, ही जलसंधारणाची कामे भविष्यात आपणाला निश्चितपणे पुढे घेऊन जातील, असा विश्वासही प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला.