बजाज समूहाने दिला नागपूर विद्यापीठाला 5 कोटींचा धनादेश.
नागपूर, - बजाज उद्योग समूहातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठआला आज, शुक्रवारी 5 कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला. विद्यापीठाच्या अंबाझरी परिसरात उभारण्यात येत असलेल्या प्रशासकीय भवनासाठी बजाज फायनान्सचे संचालक संजय भार्गव यांनी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांना धनादेश प्रदान केला.
नागपूर विद्यापीठाची सर्व प्रशासकीय कार्यालये सामावून घेणारी 4 माळ्याची भव्य इमारत वेगाने पुर्ण होत आहे. या इमारत परिसराला ‘जमनालाल बजाज प्रशासकीय परिसर’ असे नाव देण्यात आले आहे. इमारतीच्या बांधकामावर सुमारे 30 कोटीचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी 50 टक्के निधी बजाज उद्योग समुहातर्फे सीएसआर अंतर्गत प्राप्त होणार आहे. यापूर्वी 50 लाख रुपयांचा आरंभनिधी समुहातर्फे प्राप्त झाला आहे. याप्रसंगी कुलगुरू डॉ. काणे म्हणाले की, या इमारतीत सर्व प्रशासकीय विभाग एकत्रित येणार असून, अद्यावत सुविधांनी सुसज्ज राहणार आहेत. ही इमारत अत्याधुनिक व पर्यावरणपुरक राहणार आहे. शंभरीच्या उंबरठ्यावर असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नव्या युगात प्रगतीची मोठी झेप घेईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.